राणेंच्या भाजप प्रवेशाने देवगडात नवी समीकरणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

राज्याच्या राजकारणाचे पडसाद आता तालुका पातळीवर दिसू लागले आहेत. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी समीकरणे उदयास येतील. गावपातळीवरील राजकीय पटलावरही याचे बदल जाणवतील, असे चित्र आहे.  

देवगड (सिंधुदुर्ग)  : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि राज्यातील राजकारणातील शिवसेनेचे भाजपपासूनचे अलिप्त धोरण यामुळे तालुक्‍याच्या राजकारणात बदलाचे संकेत आहेत.

युती म्हणून सत्तेत असलेल्या येथील पंचायत समितीमध्ये शिवसेनेला उपसभापती पदावर पाणी सोडण्याची वेळ येण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या सभापती निवडीवेळी भाजपचाच उपसभापती होण्याची शक्‍यता असून राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. 

जिल्हा परिषदेत असे आहे पक्षीय बलाबल

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेली जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक भाजप - शिवसेनेने युती करून तर तत्कालीन आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. तत्कालीन स्थितीत जिल्हा परिषदेच्या सातपैकी किंजवडे, शिरगाव आणि पडेल जागांवर भाजपचा, कुणकेश्‍वर, बापर्डे जागांवर कॉंग्रेसचा तर पोंभुर्ले, पुरळ जागांवर शिवसेनेचा विजय झाला होता.

पंचायत समितीमध्ये असे आहे पक्षीय बलाबल

पंचायत समितीमध्ये 14 जागांपैकी भाजप आणि कॉंग्रेसने प्रत्येकी सहा जागा, तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या होत्या. पंचायत समितीमध्ये भाजपने पुरळ, पडेल, फणसगाव, किंजवडे, कोटकामते, मुणगे अशा सहा जागा, कॉंग्रेसने तिर्लोट, बापर्डे, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, कुणकेश्‍वर अशा सहा जागा तर शिवसेनेने नाडण, शिरगांव अशा दोन जागा जिंकल्या होत्या.

शिवसेना आली अल्पमतात

पंचायत समितीमध्ये 14 पैकी भाजप, शिवसेना युतीकडे 8 इतके पक्षीय बलाबल होते. त्यामुळे सभापतिपदी भाजपच्या जयश्री आडिवरेकर आणि उपसभापतिपदी शिवसेनेच्या संजय देवरूखकर यांची निवड झाली. पुढे राजकीय समीकरण बदलले आणि नारायण राणे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून स्वतःचा "स्वाभिमान पक्ष' काढला. तरीही राजकीय वातावरण बदलले नाही; मात्र आता राणेंचा भाजप प्रवेश झाल्याने शिवसेना अल्पमतात आली.

सेनेचे उपसभापतिपद धोक्‍यात 
सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात शिवसेनेने भाजपशी घेतलेली फारकत विचारात घेता शिवसेनेला आता उपसभापतिपद गमवावे लागण्याची चिन्हे आहेत. पूर्वीप्रमाणेच मूळ भाजपचा सभापती आणि राणेंसोबत भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्याला उपसभापतिपद मिळण्याची स्थिती आहे. 

गावपातळीवरही बदलाचे संकेत 
राज्याच्या राजकारणाचे पडसाद आता तालुका पातळीवर दिसू लागले आहेत. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी समीकरणे उदयास येतील. गावपातळीवरील राजकीय पटलावरही याचे बदल जाणवतील, असे चित्र आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signs Of A Big Change In Devgad Politics After Rane BJP Entry