गुड न्यूज! कोरोना रिकव्हरीत गोंदियानंतर `हा` जिल्हा अग्रेसर

विनोद दळवी 
Tuesday, 21 July 2020

दरम्यान, आज राज्य शासनाने 19 जुलैपर्यंत रुग्ण बरे होण्याची राज्यातील आकडेवारी जाहिर केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रिकव्हरीमध्ये 82.37 टक्केसह राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रिकव्हरी रेटमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 59.67 टक्‍के एवढा आहे. रिकव्हरी रेटमध्ये गोंदिया जिल्हा 83.41 टक्केसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. बाधित 229 पैकी 191 रुग्ण बरे झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाधित 279 पैकी 240 रुग्ण बरे झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 80.14 टक्केसह अकोला जिल्हा असून 2 हजार 49 पैकी 1 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. नजिकचा रत्नागिरी जिल्हा बाराव्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात 1 हजार 195 पैकी 713 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची रिकव्हरी टक्केवारी 59.67 एवढी आहे. 

जिल्ह्यात आज नव्याने एका व्यक्तिने कोरोनावर मात केली आहे. त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 241 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 32 रुग्ण सक्रिय राहिले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. दरम्यान, आज राज्य शासनाने 19 जुलैपर्यंत रुग्ण बरे होण्याची राज्यातील आकडेवारी जाहिर केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रिकव्हरीमध्ये 82.37 टक्केसह राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता.19) सायंकाळी उशिरा नव्याने 3 कोरोनाबाधित मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढून ती 279 जवळ पोहोचली होती. या तीन रुग्णामध्ये कुडाळ तालुक्‍यातील दोन आणि कणकवली तालुक्‍यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कुडाळ शहर आणि पावशी अशा दोन ठिकाणी हे रुग्ण मिळाले आहेत. तर कणकवली शहरात आणखी एक रुग्ण मिळाला आहे. हे तिन्ही रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.  

वाचा - स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर दूध आंदोलन करणारच ; आंदोलन मोडीत काढण्याचा 'तो' डाव... 

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 1 कोरोना तपासणी नमूना प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 4 हजार 668 झाली आहे. यातील 4 हजार 651 नमूने प्राप्त झाले आहेत. अजुन 17 नमूने अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील 4 हजार 372 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 279 अहवाल बाधित आले आहेत. बाधितपैकी 241 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर एक मुंबई येथे उपचारासाठी गेले आहेत. पाच व्यक्तिची दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 32 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 59 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 16 कोरोनाबाधित आणि 26 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 10 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 7 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. दरम्यान, आज जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील 2 हजार 996 व्यक्तिची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये 463 व्यक्ति वाढल्याने येथे 14 हजार 821 व्यक्ति दाखल राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 2 व्यक्ति कमी झाल्याने येथील संख्या 50 झाली आहे. गाव पातळीवरिल संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 416 वाढल्याने येथील संख्या 11 हजार 771 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 49 व्यक्ति वाढल्या असून येथील संख्या 3 हजार झाली आहे. तर गेल्या 3 दिवसांत नव्याने 4 हजार 826 व्यक्ति जिल्ह्यात दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या 1 लाख 41 हजार 787 झाली आहे. 

जिल्ह्यात तीन नवीन कंटेंटमेंट झोन 
कुडाळ येथील आदर्श पार्क, हिंदू कॉलनी येथे 100 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. याच तालुक्‍यातील पावशी येथील मिटक्‍याचीवाडी येथे 500 मीटरचा परिसर आणि ओरोस येथील मेस्त्रीवाडी येथील 500 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. या तिन्ही कंटेन्मेंट झोनमध्ये 1 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. 
 

संपादन ः राहुल पाटील

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg District second number in Corona Recovery