चंदन तस्करीचे गोवा कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

वेंगुर्ले - तालुक्‍यात चंदनाची अवैध तोड करून गोवामार्गे याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याच्या वनपथकाने काणकोण (गोवा) येथे छापा टाकला. यात प्रत्यक्षात चंदन मिळाले नसले तरी त्याच्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

वेंगुर्ले - तालुक्‍यात चंदनाची अवैध तोड करून गोवामार्गे याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याच्या वनपथकाने काणकोण (गोवा) येथे छापा टाकला. यात प्रत्यक्षात चंदन मिळाले नसले तरी त्याच्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. या वेळी चंदन विक्रीसाठी आलेल्या एकाला रंगेहाथ पकडण्यातही आले. या वेळी वनअधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रकारही घडला. 

वेंगुर्ले येथे शनिवारी चंदनाचा साठा सापडला होता. यातील वनविभागाच्या कोठडीत असलेल्या अजित गावडे याने दिलेल्या कबुलीनुसार गोव्याशी असलेले कनेक्‍शन उघड झाले. यानुसार टाकलेल्या छाप्यात कंपनीचा वॉचमन शंकराप्पा याला वनविभागाने ताब्यात घेतले. कारवाईत आंतरराष्ट्रीय चंदन तस्करी व वन्य प्राण्यांचे अवयव तस्करीचे रॅकेट चालविणारा कंपनीचा मालक जुबेर जुबी याचे कृत्य उघडकीस आल्याची माहिती सावंतवाडी वनविभागाकडून दिली आहे.

सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने काल (ता. १२) काणकोण (गोवा) येथील गोवा परफ्युमर्स या मोखर्द श्रीस्थळ काणकोण येथील बंद असलेल्या कंपनीवर छापा टाकला. येथील तपासणीअंती चंदन वाहतुकीसाठीच्या प्लास्टिक पिशव्या, वजन काटा केबल, मोटारसायकल, कागदपत्र आदी ३२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.

हा माल बाहेरच्या देशात पाठविला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कंपनीचा वॉचमन शंकराप्पा याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई दरम्यानच अब्दुल करीम नावाचा व्यक्‍ती कंपनीमध्ये ७ किलो ३०० ग्रॅम चंदन विकण्यास आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला गोवा येथील स्थानिक वनक्षेत्रपालांच्या ताब्यात देण्यात आले. 

दरम्यान कारवाई सुरू असताना कंपनीचे मालक जुबेर जुबी यांनी फोनवरून कुडाळ वनक्षेत्रपाल याना १ लाख रुपये लाच देण्याचे आमिष दाखवून प्रकरण येथेच संपवून नोकर शंकराप्पा याला यास सोडून देण्याची मागणी केली. यावेळी वनक्षेत्रपाल याना देण्यासाठी ५० हजार घेऊन राघवेंद्र याला त्याठिकाणी पाठवले. याची माहिती गोवा लाचलुचपत विभागाला कळवून राघवेंद्र याला रंगेहाथ पकडून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

शंकराप्पाला १६ पर्यंत वनकोठडी 
आज या चंदन तस्करीतील अटकेत असलेला संशयित शंकराप्पा याला कुडाळ न्यायालयाने १६ पर्यंत वनकोठडी दिली आहे. सावंतवाडी वनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या उपस्थियीत कुडाळ, कडावल, आंबोली वनक्षेत्रपाल व कर्मचारी यांनी ही धडक कारवाई  केली असून या प्रकरणाचा तसेच पसार संशयितांचा अधिक तपास चौकशी अधिकारी प्रदीप कोकितकर करीत आहेत.

Web Title: Sindhudurg Goa connection to sandalwood smuggling