ब्रिटिशकालीन पूल दुरुस्तीस मंजुरी - केसरकर

ब्रिटिशकालीन पूल दुरुस्तीस मंजुरी - केसरकर

सिंधुदुर्गनगरी - नाबार्डच्या वरिष्ठ समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या ब्रििटशकालीन विविध पूल व रस्त्यांच्या ४७ कोटी ८६ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील धोकादायक सर्व पुलांची कामे घेण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आदी उपस्थित होते.

या वेळी माहिती देताना श्री. केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात जीर्ण पुलांचा प्रश्‍न गंभीर आहे. यासाठी जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन जीर्ण पुलांचा सर्व्हे करून नाबार्डच्या वरिष्ठ समितीकडे प्रस्ताव पाठविला होता. या समितीने जिल्ह्यातील विविध पूल व महत्त्वाच्या रस्त्याच्या ४७ कोटी ८६ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये तेर्सेबांबर्डे, माडखोल, असरोंडी, हेवाळे, मांडकुली, चराठे-ओटवणे, अणाव घाटचेपेड, कोटकामते आदी पुलांसह तिथवली-खारेपाटण रस्त्या, सातोळी बावडा रस्ता आदींसह आदींसह विविध कामांचा समावेश आहे. या कामांना शासनाकडून निधी प्राप्त होताच जीर्ण पुलांची कामे मार्गी लागतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षेबाबतच्या उपाययोजनेसाठी गतवर्षी जिल्ह्याला १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्या निधीतून महत्त्वाच्या शहरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तर चालू आर्थिक वर्षात १ कोटी २० लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. पोलिस विभागामार्फत हा निधी खर्च करण्यात येत असून महत्त्वाची शहरे, पर्यटन स्थळे व समुद्र किनारे या ठिकाणी संरक्षणाच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  होईल यादृष्टीने सीसीटीव्ही बसविणयाचे नियोजन होत आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटनदृष्ट्या व आतंकवादी कारवायाच्यादृष्टीने सिंधुदुर्ग सुरक्षित होईल. यामुळे गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्यात मदत होईल.’’

जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजनमधून ६३ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. त्याचप्रमाणे महत्त्वाची विकासकामे हाती घेण्यात येतील. शाळांच्या परिसरात दरड कोसळण्यासारखी ठिकाणे आहेत अशा जागांचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना राबविण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व विकासकामांचे सॅटेलाईटवर मॅपींग होईल.’’

महावितरण, बीएसएनएलला सूचना
जिल्ह्यात महावितरण व बीएसएनएल कंपनीच्या सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व बीएसएनएलची अनियमित सेवा सुधारण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. येत्या पावसाळ्यात आवश्‍यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून मुबलक प्रमाणात निधी मिळत आहे. निधी कोठेही कमी पडणार नाही; मात्र प्रशासकीय यंत्रणेने जिल्ह्यात होणारी कामे दर्जेदार होण्याच्यादृष्टीने लक्ष द्यावे. कामे दर्जेदार होण्याच्या दृष्टीने संबंधित ठेकेदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. निधी खर्च करताना दर्जेदार कामे व्हावीत ही अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांनीच सतर्क राहून जिल्ह्यातील कामे दर्जेदार होण्याच्यादृष्टीने सहकार्य करावे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com