सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२४ शिक्षक पदे रिक्त होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सध्या ९१ जागा रिक्त - आंतरजिल्हा बदल्या झाल्यास कसरत; बदल्यांसाठी संघटनेचा दबाव

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची सद्य:स्थिती पाहता प्रत्यक्षात ९१ एवढी पदे रिक्त आहेत तर आंतरजिल्हा बदलीने ३३३ एवढे शिक्षक जिल्ह्याबाहेर स्वतःच्या जिल्ह्यात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ४२४ एवढी शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत.

सध्या ९१ जागा रिक्त - आंतरजिल्हा बदल्या झाल्यास कसरत; बदल्यांसाठी संघटनेचा दबाव

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची सद्य:स्थिती पाहता प्रत्यक्षात ९१ एवढी पदे रिक्त आहेत तर आंतरजिल्हा बदलीने ३३३ एवढे शिक्षक जिल्ह्याबाहेर स्वतःच्या जिल्ह्यात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ४२४ एवढी शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत.

जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनात आंतरजिल्हा बदलीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी ३३३ शिक्षकांच्या यादीला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना मुक्त करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. शिक्षण विभाग आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना मुक्त करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोपही केला जात आहे.

राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात केवळ ६९ एवढीच शिक्षकांची पदे रिक्त आहेत; मात्र शिक्षण विभाग रिक्त पदांची संख्या फुगवून (वाढवून) सांगत आहे असा आरोप केला आहे; मात्र जिल्ह्यातील शिक्षकांची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे यांचा विचार करता जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची मंजूर पदे ९८६ एवढी असून ६१४ पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ३७२ एवढी पदवीधर शिक्षकांची पदे ३० जूनअखेर रिक्त आहेत. तसेच उपशिक्षकांच्या एकूण ३०६४ मंजूर पदापैकी २९५४ एवढी पदे भरण्यात आली असून ११० एवढी पदे सद्य:स्थितीत रिक्त आहेत. पदवीधर व उपशिक्षक असे मिळून एकूण ४८२ एवढी पदे रिक्त आहेत; मात्र जिल्ह्यात मुख्याध्यापकांची २० मंजूर पदे असून सद्य:स्थितीत ४१३ पदे भरलेली आहेत. त्यामुळे ३९३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. हे सर्व अतिरिक्त ठरलेले शिक्षक संबंधित शाळांवर शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने केवळ ९१ एवढीच पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात इच्छुक असलेल्या ३३३ एवढ्या शिक्षक यादीला मंजुरी मिळाल्याने या शिक्षकांना मुक्त केल्यास जिल्ह्यात सध्या रिक्त असलेली ९१ पदे आणि आंतरजिल्हा बदलीने रिक्त होणारी ३३३ एवढी शिक्षक पदे पाहता जिल्ह्यात ४२४ एवढी पदे रिक्त होणार आहेत.

शिक्षण प्रशासनाची कसरत
आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना तत्काळ मुक्त करा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होऊ लागली आहे. तसेच बदलीपात्र शिक्षक आपल्या जिल्ह्यात जाण्यास उत्सुक आहेत. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना मुक्त केल्यास रिक्त पदांची संख्या वाढणार आहे. पालकांकडून पदे भरण्यासाठी दबाव येण्याची शक्‍यता आहे. यामुळे शिक्षण विभाग दुहेरी कात्रीत सापडला आहे.

Web Title: sindhudurg konkan news 424 teacher post empty in district