सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मदर घटताच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मदर घटताच

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याच्या जन्मदरात घट झाली आहे. २०१६ मध्ये जन्मदर ९.०५ वर पोहोचला आहे. आज लोकसंख्या दिनानिमित्तच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्याच्या जन्म प्रमाणात घट दिसून येत आहे. शासकीय योजनांची व उपाययोजनांची प्रभावी अमलबजावणी जिल्ह्यात होत असल्याने जन्मप्रमाणात घट झाली आहे. २०११ मध्ये ११.०१, २०१२ मध्ये १०.६८, २०१३ मध्ये १०.०२, २०१४ मध्ये ९.९९, २०१५ मध्ये ९.८ तर २०१६ मध्ये ९.०५ एवढे प्रमाण झाले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची १ ते ३० ऑगस्ट या कालावधीत आरोग्य व रक्तगट तपासणी करण्याची मोहीम आरोग्य व शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आरोग्य व शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. साळे म्हणाले, ‘‘लोकसंख्यावाढीचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी शासनाने विविध योजना अमलात आणल्या आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक आहे. चीन प्रथम क्रमांकावर असला तरी त्यांच्या जननदरात बरीच घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार २०२५ पर्यंत भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकणार आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. लोकसंख्यावाढीची अनेक कारणे आहेत. त्यांमध्ये कमी वयात मुलींचे विवाह, मुलगा म्हातारपणाचा आधार ही मानसिकता असल्याने जोपर्यंत मुलगा होत नाही, तोपर्यंत कुटुंबात अनेक मुले जन्माला येणे, गरिबी व अशिक्षितपणा ही प्रमुख कारणे आहेत. लोकसंख्यावाढीचे दुष्परिणामही अधिक आहेत. यासाठी शासनाने लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण अवलंबले असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.’’

या वेळी सौ. सावंत म्हणाल्या, ‘‘जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्ह्यात २७ जून ते १० जुलै या कालावधीत दांपत्य संपर्क पंधरवडा आयोजित करून आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कुटुंब नियोजन पद्धतीची व साधनांची माहिती देण्यात आली. त्यांना योग्य त्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. ११ जुलै ते २४ जुलै या कालावधीत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व तांबी बसविणे शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पात्र जोडप्यांना संततिप्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात आले.’’

अशी होणार रक्तगटांची तपासणी
यापूर्वी मुलींची आरोग्य व रक्तगट तपासणी करण्यात आली आहे. आता सर्व मुलगे या तपासणीत समाविष्ट करून सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विद्यार्थ्यांच्या रक्तगटाबाबत माहिती कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४५५ शाळांमध्ये एकूण ४१,८५६ विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या २०९०२ तर मुलांची संख्या २०९५४ एवढी आहे. नव्याने पहिलीमध्ये दाखल झालेल्या मुली व सर्व मुलगे यांची रक्तगट तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com