मेगा बदली प्रक्रियेमुळे शिक्षण क्षेत्र अस्वस्थ

मेगा बदली प्रक्रियेमुळे शिक्षण क्षेत्र अस्वस्थ

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तब्बल १८८ शिक्षकांच्या बदलीची तयारी सुरु केली आहे. नव्या धोरणानुसार होणाऱ्या या सगळ्या बदल्या झाल्यास ही आतापर्यंतच्या इतिहासातील मेगा बदली प्रक्रिया ठरेल; मात्र यामुळे आधीच शैक्षणिक दर्जा ढासळत असल्याची ओरड असलेल्या प्राथमिक शाळांचा दर्जा टिकविणे कठीण बनेल, अशी भीती शैक्षणिक वर्तुळात आहे. जवळपास निम्मे शिक्षक या ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे संभ्रम आणि दबावाखाली आहेत.

राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा बदली धोरणामध्ये मोठे बदल केले; मात्र हे आदेश फारसे वस्तुस्थितीला धरुन नसल्याने या बदली प्रक्रियेमुळे शैक्षणिक क्षेत्रात सुधारणेऐवजी अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे. पूर्वी ठराविक कालावधीनंतर एका तालुक्‍यातून दुसऱ्या तालुक्‍यात शिक्षक बदल्या व्हायच्या. याला संघटनांनी विरोध केल्यानंतर जिल्हास्तरीय बदल्या रद्द करण्यात आल्या. तालुक्‍यांतर्गतच बदली प्रक्रिया राबवू जावू लागली. ठराविक सेवा एका शाळेवर झाल्यानंतर तो शिक्षक बदलीपात्र ठरवला जायचा. त्यांची यादी करुन त्यातील १५ ते २० टक्के बदल्या दरवर्षी व्हायच्या. या बदल्याही समुपदेशन पद्धतीने होत असत. चांगला शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य तितकेच महत्वाचे मानून त्यांच्या सोयीचा विचारही या प्रक्रियेमध्ये असायचा. यंदा मात्र यात मोठे बदल करण्यात आले. अवघड क्षेत्र आणि सुलभ क्षेत्रातील शाळा निश्‍चित करुन एका तालुक्‍यात दहा वर्षे सेवा झालेले सर्व शिक्षक बदलीस पात्र ठरवण्यात आले. यातील सगळ्यांच्या बदल्यांच्या होणार की किती जणांच्या याचे धोरण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिक्षण विभागाने बदलीपात्र शिक्षकांची यादी निश्‍चित केली आहे. त्यात १२८० उपशिक्षक आणि ५०८ पदवीधर अशा १७८८ जणांची यादी निश्‍चित झाली आहे. जिल्ह्यात ११९४ सुलभ क्षेत्रातील तर २६१ अवघड क्षेत्रातील शाळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. १७८८ च्या यादीमधील १०० टक्के बदल्या झाल्यास अनेक शाळांमध्ये पूर्ण यंत्रणाच नवीन असणार आहे. त्यांना तिथली भौगोलिक स्थिती, मुलांची मानसिकता, शाळांना सहकार्य करणारे घटक हे समजून घ्यायलाच काही कालावधी जावा लागणार शिवाय अनेकांच्या बदल्या गैरसोयीच्या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे. कारण या प्रक्रियेत समुपदेशनाऐवजी संगणक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या सगळ्यामुळे शिक्षकांमध्ये  कमालीची अस्वस्थता आहे.

सद्यस्थितीत तीन टप्प्यात बदल्या होणार आहेत. यातील अतिरीक्त शिक्षकांकडून रिक्तपदे असणाऱ्या शाळांकडे बदल्यांची प्रक्रिया बहुसंख्य शाळांमध्ये पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात अपग्रेड मुख्याध्यापक असलेल्या शाळांमध्ये नवा पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांमधील अपग्रेड मुख्याध्यापक पदे रद्द झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यामध्ये अपग्रेड मुख्याध्यापकांचे इतर पदांवर समायोजन झाले. या दोन जिल्ह्यांसाठी मात्र आता अपग्रेड मुख्याध्यापक असलेल्या शाळेवर त्यांना निवृत्तीपर्यंत ठेवावे, असा निर्णय झाला.

कामकाज वाटपाचा प्रश्‍न
शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास उपशिक्षकाची बदली करण्याचा आदेश निघण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास कामकाज वाटपाचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे. यानंतर बदलीपात्र ठरलेल्या शिक्षकांच्या बदलीची मेगा प्रक्रिया राबविली जावू शकते. ही प्रक्रिया ऑगस्टमध्ये होण्याची शक्‍यता आहे; मात्र इतक्‍या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्यास शाळांच्या दर्जावर चांगला ऐवजी वाईट परिणाम होण्याची जास्त भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com