सिंधुदुर्गनगरीत तीन दिवसांनंतर वीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे ठिकठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेले तीन दिवस सिंधुदुर्गनगरीसह बराचसा ग्रामीण भाग अंधारात राहिला. स्मृतिवनातील सुरूची झाडे वीज वाहिन्यांवर पडल्याने शासकीय कार्यालयातील वीजपुरवठा तीन दिवस खंडित होता. तो आज पूर्ववत झाला.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ५०.९५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ७४०.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अद्यापही संततधार पाऊस पडून रस्त्यावर पाणी चढण्याएवढी पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही, तरीही अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी पडत असल्याने शेतीच्या कामाला जोर चढला आहे, तर अधूनमधून सूर्यदर्शनही होत आहे.

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावर धोकादायक (रस्त्यावर कलंडलेली) झाडे आहेत. सामाजिक वनीकरणच्या मालकीच्या हद्दीत स्मृतिवनात मोठमोठी सुरूची झाडे रस्त्यावर व विद्युत वाहिन्यांवर झुकली आहेत, मात्र ही झाडे तोडण्यासाठी वनविभागाकडून दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे, तर सिंधुदुर्गनगरीला गेले तीन दिवस अंधारात राहावे लागले. 

गेले तीन दिवस शासकीय कार्यालयाना सुट्टी असल्याने विज वाहिन्यांवर पडलेल्या झाडांची कोणीही दखल घेतली नाही; मात्र आज शासकीय कार्यालये पूर्ववत सुरू झाल्याने वनविभाग आणि वित वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाहिन्यांवरील झाडे बाजूला करून वीज पुरवठा सुरळीत केला. स्मृतीवनातील सुरूची मोठी झाडे पडल्याने विजेचे खांब आणि विजवाहिन्या जमिनदोस्त झाल्या होत्या.

Web Title: sindhudurg konkan news electricity after 3 days