उसप अपहारप्रकरणी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कारवाईची मागणी - ७ लाखांच्या निधीबाबत नोंदविला आक्षेप

सिंधुदुर्गनगरी - उसप (ता. दोडामार्ग) ग्रामपंचायतीमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने ग्रामनिधीसह १३ वा व १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये सुमारे ७ लाखांहून अधिक निधीचा अपहार केल्याचा ठपका आहे. संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

उसप या ग्रामपंचायतीमध्ये १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीमध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रामनिधी, १३ वा व १४ वा वित्त आयोग इत्यादी निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करून लाखो रुपये निधी हडप केल्याचा आरोप आहे. 

सुमारे ७ लाखाहून अधिक निधीचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत १८ जानेवारीला दोडामार्ग गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. परंतु चौकशीला दिरंगाई होवू लागल्याने १० मार्चला याच्या निषेधार्थ पंचायत समिती दोडामार्ग येथे ग्रामस्थांनी उपोषण छेडले. त्यानंतर गटविकास अधिकारी दोडामार्ग यांनी या प्रकरणी चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला; मात्र अद्याप या अपहाराबाबत संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. भ्रष्टाचाराला प्रशासन पाठिशी घालत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
याबाबत उसप ग्रामस्थ निलेश नारायण नाईक, प्रवीण विठ्ठल गवस, प्रकाश पांडूरंग गवस, गंगाराम गवस, प्रेमानंद सुतार, दिनेश नाईक, संदेश गवस, संजय सुतार, सुनील गवस यांनी आजपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे तर लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात येत आहे.

चौकशीत अपहार झाल्याचे पुढे
दोडामार्ग गटविकास अधिकारी यांनी तक्रारीनुसार केलेल्या चौकशीत ग्रामनिधी, १३ वा व १४ वा वित्त आयोग यासह विविध योजनेत आवश्‍यक बाबींची पूर्तता न करताच निधीची उचल करण्यात आली आहे. सुमारे ७ लाखाचा अपहार झाला असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे. मात्र अद्यापही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Web Title: sindhudurg konkan news Fasting in the case of usap