सिंधुदुर्गात मुसळधार!

झरेबांबर - मुसळधार पावसाने येथील रस्त्याला नदीचे रूप आले.
झरेबांबर - मुसळधार पावसाने येथील रस्त्याला नदीचे रूप आले.

अनेक गावांचा संपर्क तुटला - कुडाळ-आंबेडकरनगरला पुराचा वेढा

सिंधुदुर्गनगरी - मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. महामार्गावर ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली. कुडाळमध्ये आंबेडकरनगरला पुराच्या पाण्याने वेढले. दोडामार्गसह सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सावंतवाडीतील मोती तलाव पाण्याने तुडुंब भरल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची वेळ आली. भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. वेंगुर्लेत घराची भिंत पडून महिला गंभीर जखमी झाली.

जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर वाढला आहे. मात्र पाऊस अधून मधून विश्रांती घेऊन कोसळत होता. काल रात्रीपासून पावसाचा जोर अचानक वाढला. उशिरापर्यंत मुसळधार सुरूच होता. यामुळे ठिकठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली. सावंतवाडी, फोंडा, कणकवली, कुडाळ आदी शहरांत गटार तुंबून पाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडले. जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणत्याही मोठ्या हानीची नोंद नसली तरी अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाल्याचे प्रकार घडले.

महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी झाडे पडल्याने विस्कळीत झाली. पिठढवळ आणि भंगसाळ नदीचे जुने पूल पाण्याखाली गेले. उशिरापर्यंत या नद्यांचे पाणी वाढत असल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. 
पावसाने कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्‍यांना झोडपून काढले. संपूर्ण दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. सततच्या पावसामुळे तिन्ही तालुक्‍यांतील नदी आणि ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवसभर जनजीवन देखील विस्कळीत झाले होते.

देवगड तालुक्‍यात नाद येथे वीज तारा तुटल्याने विजय गावकर यांचा एक बैल आणि एक म्हैस दगावली. देवगड शहर आणि परिसरात आज वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत होता. किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोराच्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले. 

वैभववाडी तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा भुईबावडा घाटात दरड कोसळली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती; तर वाभवे येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. आज सकाळी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यालगत कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

कणकवली तालुक्‍यातही दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या. खारेपाटण शहर आणि परिसरात पूरस्थिती होती. विजयदुर्ग खाडीपात्राला भरती असल्याने खारेपाटणच्या सखल भागात पाणी साठले होते. खाडीकिनारपट्टी भागातील भातशेती पुराच्या पाण्याखाली आहे. रात्री देखील पाऊस सुरू झाल्यास खारेपाटण शहराला पुराचा धोका आहे. फोंडाघाट परिसरातील मुसळधार पावसामुळे दुपारी फोंडाघाट बसस्थानकात काही काळ पाणी आल्याने प्रवाशांची धावपळ उडाली होती. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने येथील वाहतूक पूर्ववत झाली. कणकवली तालुक्‍यात पावसाचा जोर असला तरी सायंकाळी उशिरापर्यंत नुकसानीची नोंद नव्हती.

कुडाळ तालुका या पावसामुळे जलमय झाल्याची स्थिती होती. भंगसाळ आणि पिठढवळचे जुने पूल पाण्याखाली गेले. शहरालगतच्या आंबेडकरनगराला पाण्याने वेढा घातला. यामुळे पंधरा ते वीस घरांना धोका निर्माण झाला. महामार्गावर मोडका वड येथे रस्त्यावर झाड पडून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. नेरूर-कविलगाव येथे घरावर झाड पडून नुकसान झाले. माणगाव खोऱ्यात पुराची तीव्रता जास्त होती. तेथील आंबेरी पुलावर पाणी आल्याने सुमारे तीन तास माणगाव खोऱ्याचा इतर भागाशी असलेला संपर्क तुटला होता.

मालवण तालुक्‍यात पावसाचा कहर सुरूच होता. समुद्रही प्रचंड खवळल्याने अतिक्रमणग्रस्त भागात धोका निर्माण झाला आहे. मालवण शहरातील देऊळवाडा येथे विजेचे खांब पडून पुरवठा खंडित झाला.

दोडामार्ग तालुक्‍यात पावसाची तीव्रता जास्त होती. ग्रामीण भागात अनेक कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले. यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता. तिलारी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे तिलारी नदी धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत होती.

सावंतवाडी तालुक्‍यातही पूरजन्य स्थिती निर्माण झाली. कोंडुरा, माजगाव आदी पूल पाण्याखाली गेले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आंबोलीत तुफान पाऊस झाला. घाटात दगड पडल्याचे प्रकारही घडले. सावंतवाडीचा मोती तलाव आजच्या पावसाने तुडुंब भरला. श्रीराम वाचन मंदिरसमोरील तलावाची पाणी सोडण्याची चावी असलेल्या ठिकाणाहून अतिरिक्त पाणी वाहू लागले. चावी पूर्ण खोलून तलावाचे पाणी सोडण्यात आले.

वेंगुर्ले तालुक्‍यातही पावसाने झोड उठविली. तेथे घराची भिंत पडल्याने शहरातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. तालुक्‍यात इतर भागातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

चोवीस तासातील पाऊस व
कंसात आतापर्यंतचा सरासरी पाऊस असा -

दोडामार्ग २९ (१६६१), सावंतवाडी ३७ (१६५३.८), वेंगुर्ले २२ (१३४९.५३), कुडाळ ४३ (१३६८), मालवण १७ (११५०.४), कणकवली ३९ (१७९८), देवगड २८ (११०८), वैभववाडी ६८ (१४१४). जिल्ह्याची एकूण सरासरी ३५.३७ (१४३७.८३).
 

पिठढवळ, भंगसाळच्या जुन्या पुलावर पाणी
पिठढवळ आणि भंगसाळ या महामार्गावरील जुन्या पुलावरून पाणी वाहत होते. दरवर्षी पिठढवळवर पाणी आल्याने महामार्ग ठप्प होतो. यंदा पिठढवळवरील नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक मात्र सुरळीत होती.

वेंगुर्ले-दाभोसवाडा येथे घराची भिंत पडून महिला गंभीर

आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्याचा संपर्क तुटला
तिलारी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली
मोती तलाव काठोकाठ भरला
आंबोलीत मुसळधार पाऊस
कोंडुरा पुलावर पाणी
मालवणात विजेचे खांब पडून पुरवठा ठप्प
भुईबावडा घाटात दरड
दोडामार्गमधील अनेक गावे संपर्कहीन
कुडाळ-आंबेडकरनगरमध्ये २० ते 
२५ घरांना पुराचा वेढा

सावंतवाडीत झाड कोसळले
सावंतवाडी येथील महिला निवारा केंद्रावर रात्री साडे दहाच्या सुमारास झाड कोसळले. यात कोणीही जखमी झाले नाही; मात्र नुकसान झाले आहे. नागरिकांनी झाड बाजूला केले. 

नवा महामार्ग वेत्ये येथे खचला
झाराप-पत्रादेवी या नव्या महामार्गाच्या निकृष्ट कामाचा आजच्या पावसाने पर्दाफाश केला. मुसळधार पावसामुळे या महामार्गावर वेत्ये-खांबलवाडी येथे एका बाजूचा रस्ता खचला. यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. काही दिवसापूर्वी या परिसरात महामार्गावर मोठा खड्डा पडला होता. अद्याप उद्‌घाटनही न झालेल्या या महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार आतापासूनच सुरू झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com