सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘जांभूळ’च्या उत्पादनात होतेय घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

कडावल - बदलते हवामान, इमारती कामांसाठी होणारा जांभूळ झाडांचा वापर तसेच अन्य विविध करणांमुळे जांभुळ उत्पन्नात दिवसेंदिवस घट येत आहे. याचा फटका उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना बसत आहे. सतत वाढणारी मागणी व जांभळाला मिळणाऱ्या बाजारभावाचा विचार करता आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता जांभळाच्या पारंपारिक लागवडीवर अवलंबून न राहता व्यावसायिक दृष्टीकोन बाळगला आहे. यामुळे जांभळाच्या आधुनिक जातींची लागवड करणे गरजेचे बनत आहे.

कडावल - बदलते हवामान, इमारती कामांसाठी होणारा जांभूळ झाडांचा वापर तसेच अन्य विविध करणांमुळे जांभुळ उत्पन्नात दिवसेंदिवस घट येत आहे. याचा फटका उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना बसत आहे. सतत वाढणारी मागणी व जांभळाला मिळणाऱ्या बाजारभावाचा विचार करता आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता जांभळाच्या पारंपारिक लागवडीवर अवलंबून न राहता व्यावसायिक दृष्टीकोन बाळगला आहे. यामुळे जांभळाच्या आधुनिक जातींची लागवड करणे गरजेचे बनत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, नारळ सुपारी यासारख्या बागायती िपकांबरोबरच जांभूळ उत्पादनापासून आर्थिक उत्पन्न मिळते. ग्रामीण भागात जांभूळ काढण्याचा व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दलाल शेतकऱ्यांकडून जांभळाची थेट खरेदी करतात. येथून जांभळाची संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर निर्यात होते. जांभूळ खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अनेक तरूण कार्यरत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच त्यानाही रोजगाराचा हंगामी पर्याय उपलब्ध झाला आहे.

एक स्वादिष्ट फळ म्हणून जांभळाचा खाण्यासाठी उपयोग होतोच तसेच मधुमेहा सारख्या रोगावर गुणकारी म्हणून औषध निर्मिती व मद्य निर्मिती उद्योगातही जांभळाना मोठी मागणी आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारे जांभूळ हे एक महत्वाचे बागायती पीक म्हणून पुढे येत असतानाच आता निसर्गाची वक्रदृष्टी इतर पिकांप्रमाणेच जांभळावरही पडू लागली आहे.

नैसर्गिक असमतोल, हवामानात होणारे बदल तसेच अवेळी पडणाऱ्या पावसामुळे जांभूळ उत्पन्नातात काही वेळा घट येते. तर काढणीस तयार असलेल्या फळांची अकस्मात पडलेल्या पावसामुळे नासाडी होऊनही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. जांभूळ पीकास सहसा रोगांची लागन होत नाही. या पीकाचे बहुतांश नुकसान हे पावसामूळेच होते. 

जांभळाचे झाड अतिशय टणक असल्यामुळे त्याचा वापर इमारती कामासाठी होतो. त्यामुळे या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. जांभूळ उत्पादनात घट येत आहे. जांभळाचे झाड हे कोरडवाहू असल्याने त्याला अधिक पाण्याची गरज भासत नाही. त्याची इतर बागायती वृक्षांप्रमाणे विशेष देखभालही करावी लागत नाही. या फळाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. दरही चांगला मिळतो. त्यामुळे जांभळाची व्यापारी तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे.

व्यापारी तत्त्‍वावर लागवड हवी
सध्या जांभळाचे बहुतांश उत्पादन हे पारंपरिक लागवडीपासून घेतले जाते. अधिक उत्पादन देणाऱ्या जांभळाच्या नवीन जाती आता कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. या उपयुक्त संशोधनाचा वापर करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपयुक्त वृक्षाची आधुनिक पद्धतीने व्यापारी तत्त्‍वावर लागवड करण्याची गरज आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील जांभूळ उत्पादन सध्याच्या तुलनेत कित्येक पटीने वाढू शकेल. त्यामुळे आर्थिक उलाढालही वाढून शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक लागवडीवरच अवलंबून न राहता आधुनिक लागवडीचा महामंत्र जोपासने महत्त्‍वाचे आहे.

Web Title: sindhudurg konkan news jambhul production decrease