सिंधुदुर्गात पुन्हा मायनिंग लॉबी सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

छुपे जमीन व्यवहार - गोव्यात खाण उद्योगावरील निर्बंध कडक झाल्याचा परिणाम
कोलझर - गोव्यात खाणींवरील निर्बंध अधिक कडक झाल्याने सिंधुदुर्गात खाण उद्योगासाठीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. खाण क्षेत्रातील गावांमध्ये छुप्या पद्धतीने विविध आमिषे दाखवून जमिनींची खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. गोव्यातील खाण लॉबी जिल्ह्यात हात-पाय पसरण्यासाठी ताकद लावताना दिसत आहे.

छुपे जमीन व्यवहार - गोव्यात खाण उद्योगावरील निर्बंध कडक झाल्याचा परिणाम
कोलझर - गोव्यात खाणींवरील निर्बंध अधिक कडक झाल्याने सिंधुदुर्गात खाण उद्योगासाठीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. खाण क्षेत्रातील गावांमध्ये छुप्या पद्धतीने विविध आमिषे दाखवून जमिनींची खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. गोव्यातील खाण लॉबी जिल्ह्यात हात-पाय पसरण्यासाठी ताकद लावताना दिसत आहे.

गोव्यात सिंधुदुर्गाच्या सीमेवर असलेल्या सत्तरी, डिचोली आणि सांगे या तीन तालुक्‍यांमध्ये खाण क्षेत्र आहे. यातील काही खाणी पोर्तुगीज सत्ता काळापासून सुरू आहेत. गोव्यातील खाण लॉबी ठराविक उद्योगपतींच्या हातात असून या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आणि राजकीय साटेलोटे आहेत. असे असले तरी गोव्यात गेल्या काही वर्षांमध्ये खाण व्यवसाय वाढवत नेणे कठीण बनले आहे. मुळात तेथील खाणक्षेत्र संपत आले आहे. शिवाय पर्यावरण विषयी निर्बंधामध्ये वाढ होत आहे. गोव्यातील लोकांमध्ये पर्यावरणविषयी संवेदनशीलता वाढल्याने खाणी विरोधातील आंदोलनांना धार येऊ लागली आहे. पर्यावरणाचे सर्व निकष पाळून खाण चालविणे कठीण आहे. मध्यंतरी न्यायालयाने गोव्यातल्या खाण व्यवसायावर बंदी आणली होती. ती बंदी उठविल्यानंतर काही प्रमाणात या व्यवसायाला दिलासा मिळाला होता.

असे असले तरी गोव्यातील खाण व्यवसायातील अनिश्‍चिततेमुळे खाण लॉबीने लगतच्या सिंधुदुर्गाकडे लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात सुमारे ४० गावांमध्ये खाण क्षेत्र आहे. तेथील जागा खरेदी करण्याचा सपाटा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

पर्यावरणवाद्यांनी आणि स्थानिकांनी याला विरोध केल्याने मधल्या काळात जिल्ह्यात खाणीसाठीच्या हालचाली थंडावल्या होत्या. तरीही कळणे, सातार्डा, साटेली, रेडी आदी भागात उत्खनन सुरू होते. आता पुन्हा जिल्ह्यात गोव्यातील खाण लॉबी सक्रिय झाली आहे. याचे कारण म्हणजे गोव्यातील खाणीवर न्यायालयीने पुन्हा नवे निर्बंध जारी केले आहेत. मे महिन्यात गोव्यातील सत्तरी तालुक्‍यातील सोनशी भागात खाणीपासून होणाऱ्या धुळ प्रदूषणाविरोधात तेथील स्थानिकांनी आंदोलन केले. खनिज वाहतूक रोखण्यात आली. 

धुळ प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आंदोलकांचा आरोप होता. मात्र या आंदोलकांपैकी वीसजणांना अटक करून तुरुंगात डामण्यात आले. त्यामुळे हा वाद चिघळला. पर्यावरणवाद्यांनी या विरोधात आवाज उठविला. यावर प्रदूषण होतच नाही असा दावा करण्यात आला. हे प्रकरण न्यायालयातही गेले. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर न्यायालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ माईन या संस्थेला प्रदूषणविषयी अहवाल बनविण्याचे आदेश दिले. हा अहवाल न्यायालयात सादर झाला.

त्यात प्रदूषणाबाबत स्थिती गंभीर असल्याचे पुढे आले. या अहवालात खाणींनी करायचे उपायही देण्यात आले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याची पूर्तता न झाल्यास गोव्यातील बहुसंख्य खाणी नव्या हंगामात सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र हे उपाय योजणे खाण व्यावसायिकांना खूपच कठीण आहे.

या अहवालात खाणीतील अंतर्गत व इतर रस्त्यांचे डांबरीकरण, धुळरोधक यंत्रणा उभारणी, धूळ मोजणारी यंत्रणा अधिक ठिकाणी उभारणे आदी खर्चिक बाबींचा समावेश आहे. एकूणच स्थिती पाहता गोव्यात दीर्घकाळ हा व्यवसाय पुढे नेणे कठीण असल्याचे खाण लॉबीच्या पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा सिंधुदुर्गाकडे वळविला आहे. येत्या हंगामात चालू असलेल्या खाणींमध्ये उत्खननाचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. या बरोबरच नव्याने खाणी सुरू करण्याच्या दृष्टीने मध्यंतरी थंड पडलेल्या हालचाली सुरू झाल्या आहेत. छुप्या पद्धतीने जमीन खरेदी सुरू आहे. यात गोपनीयता पाळली जात आहे.

जमीन खरेदीसाठी एजंट सक्रिय
दोडामार्ग तालुक्‍यात जमीन खरेदीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. महसूलमधील काही लोकांना हाताशी धरून हे व्यवहार केले जात आहेत. कुडाळ तालुक्‍यातील काही एजंट यात सक्रिय असल्याचे समजते. जमिनीशी संबंधित लोकांना गाठून जास्त काळ चर्चा न करता झटपट व्यवहार पूर्ण केले जात आहेत. यात कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे.

Web Title: sindhudurg konkan news mining lobby in sindhudurg