सुशोभीकरणाचे २५ वर्षांत नियोजनच नाही

नंदकुमार आयरे
मंगळवार, 6 जून 2017

उदासीन धोरण - जंगली झुडपांमुळे इमारतींचे सौंदर्य हरवले
सिंधुदुर्गनगरी - निसर्गरम्य पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या जिल्हा मुख्यालय शासकीय संकुल परिसर सुशोभीकरणाबाबत गेल्या २५ वर्षांत विचार झालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अद्यापही ओस पडला आहे.

उदासीन धोरण - जंगली झुडपांमुळे इमारतींचे सौंदर्य हरवले
सिंधुदुर्गनगरी - निसर्गरम्य पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या जिल्हा मुख्यालय शासकीय संकुल परिसर सुशोभीकरणाबाबत गेल्या २५ वर्षांत विचार झालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अद्यापही ओस पडला आहे.

एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी (जिल्हा मुख्यालय) गेल्या पंचवीस वर्षांत एका पर्यटन स्थळाप्रमाणे सुशोभित व आकर्षक बनविणे आवश्‍यक होते; मात्र आतापर्यंत तसा विचार झालेला नाही किंवा नियोजनबद्ध असे सुशोभीकरण झालेले नाही. जिल्हाधिकारी संकुल परिसराची स्थिती अद्यापही जंगलमय अशीच आहे. परिसरात वाढणारे गवत आणि जंगली झुडपे यामुळे शासकीय संकुल इमारतीचे सौंदर्यच नाहीसे झाले आहे.

शासकीय संकुलात प्रवेश करताच पर्यटन स्थळावर आल्याचा आनंद मिळावा, येथे काम करणाऱ्या आणि कामासाठी येणाऱ्यांना आनंदी वातावरणात काम करता यावे, यादृष्टीने जिल्हाधिकारी शासकीय संकुल परिसराचे सुशोभीकरण होणे आवश्‍यक आहे; मात्र प्रशासनाकडून आतापर्यंत परिसर सुशोभीकरणाबाबत विचार आणि खर्च केलेला नाही. यामुळे येथे जंगलमय स्थिती पहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी संकुल परिसरात आकर्षक गार्डनचे स्वरुप यावे यासाठी नियोजनबद्ध शोभेची फुलझाडे, हिरवळ (लॉन) आणि त्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र (माळी) व्यवस्था झाल्यास पर्यटन जिल्ह्याची राजधानी असलेल्या जिल्हाधिकारी संकुलाच्या सौंदर्यात भर पडू शकेल; मात्र गेल्या पंचवीस वर्षात सुशोभिकरणावर खर्च झाला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास आणि विविध विकासकामांवर सुमारे दीडशे कोटीहून अधिक निधी खर्चाचे नियोजन करणाऱ्या जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सुशोभिकरणाबाबत दुर्लक्ष झालेला दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातील शासकीय इमारती परिसराची दुर्दशा पहायला मिळत आहे.

जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यांगतांसाठी किंवा येथील स्टॉलधारक, विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र सुलभ शौचालयाची व्यवस्थाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे या परिसरात येणारा प्रत्येक वाटसरु, अभ्यांगत, स्टॉलधारक, विक्रेते आणि नोकर भरतीसाठी येणारे उमेदवार येथील शासकीय कार्यालयातील शौचालयाचाच वापर करतांना दिसत आहेत. काहीवेळा शासकीय कार्यालयातील शौचालयातील पाणीपुरवठा बंद असतो अशावेळी शासकीय कार्यालयातील शौचालयाची घाण केली जाते. यामुळे जिल्हा मुख्यालय संकुल परिसरात स्वतंत्ररित्या सुलभ शौचालयाची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे; मात्र प्रशासनाकडून याचा अद्याप गांभीर्याने विचारा झालेला नाही. त्यामुळे नोकर भरतीच्यावेळी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकडून शौचासाठी येथील झाडा-झुडपाचा आधार घेतला जातो. परिणामी परिसरात काही दिवस दुर्गंधीचा अनुभव येतो.

स्वच्छतागृहांची गरज
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद परिसर सुशोभिकरण करुन या ठिकाणी देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्यास जिल्हा मुख्यालयाच्या सौंदर्यात भर पडणार आहे, तसेच अभ्यागतांसाठी स्वतंत्र सुलभ शौचालय, स्वतंत्र पाणी व्यवस्था झाल्यास या परिसराचा कायापालट होवू शकेल तसेच पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त होऊ शकेल. येणाऱ्या अभ्यांगतांना बगिच्यातील हिरवळीवर बसून कामकाजातील प्रतिक्षेचा वेळ आनंदाने घालविता येणेही शक्‍य होवू शकेल.

Web Title: sindhudurg konkan news There is no planning for beautification in 25 years