जिल्हा मुख्यालयाचा भरकटलेला प्रवास

जिल्हा मुख्यालयाचा भरकटलेला प्रवास

बऱ्याच मतमतांतरानंतर सिंधुदुर्गाची राजधानी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसवण्याचे निश्‍चित झाले. जिल्ह्याची राजधानी म्हणून सिंधुदुर्गनगरीची निर्मिती झाली. नियोजित शहर म्हणून वसविण्याच्या घोषणा झाल्या; पण आज २५ वर्षांनंतर धड शहरही नाही आणि धड गावही नाही, अशी स्थिती या नगरीची झाली आहे. सिंधुदुर्गनगरीच्या या विकास वेदनांवर प्रकाशझोत टाकणारी ही मालिका आजपासून...

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय म्हणून वसवलेल्या सिंधुदुर्गनगरीच्या विकासासाठी गेली २५ वर्षे नवनगर प्राधिकरण चाचपडताना दिसत आहे. विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या सिंधुदुर्गनगरीच्या विकासाची दिशा मात्र भरकटतांना दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय म्हणून सिंधुदुर्गनगरी निर्मितीनंतर २५ वर्षे लोटली. नियोजित शहर वसवण्याचा कागदावर आराखडा बनला; मात्र अपेक्षित विकास अद्याप झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीचा विकास करणे ही नवनगर प्राधिकरणाची जबाबदारी आहे. गेल्या २५ वर्षांत अनेकवेळा सिंधुदुर्गनगरीच्या विकासाचे आराखडे बनविले; मात्र आराखड्यानुसार विकासाची कामे झालीच नाहीत. जसे अधिकारी बदलले तसे सिंधुदुर्गनगरीच्या विकास आराखड्यातही बदल होत गेले. दिशाहीन भरकटलेल्या विकास आराखड्यांमुळे विकास कामातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. विकासकामांवर आतापर्यंत झालेला कोट्यवधीचा खर्च वाया गेल्याचे चित्र पहायला मिळते.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय वसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या. जिल्हा मुख्यालयाच्या प्रशस्त शासकीय इमारती उभारल्या. विविध नियोजित विकासकामांसाठी जागा निश्‍चित केल्या. प्राधिकरण क्षेत्रातील भविष्यातील रस्त्याचे मार्ग निश्‍चित झाले. 

शासकीय कार्यालये, निवासी संकुल यासह नाट्यगृह, मिनी चित्रपटगृह, एस.टी. डेपो, हॉकर्स प्लाझा या सारख्या सुविधांबरोबरच नाना-नाकी पार्क, टाऊन पार्कसारख्या सुविधा निर्माण करण्याचे नियोजन झाले; मात्र ही कामे गेली २५ वर्षे उलटली तरी अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत. वारंवार बदलणारे आराखडे आणि बदलणाऱ्या नियोजित जागा यामुळे सिंधुदुर्ग नगरीचा विकास भरकटत चाललेला दिसत आहे.

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. सोयी-सुविधा अभावी येथील रहिवासी संख्याही वाढलेली दिसत नाही. या प्राधिकरणातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र अद्यापही अविकसित आहे. नवनगर प्राधिकरणाने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून संपादीत केलेल्या जमिनीची मोठ्या प्रमाणात विक्री केली; मात्र तेवढ्याच झपाट्याने त्या जमिनीचा विकास होताना दिसत नाही. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास खुंटलेला आहे.

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणातर्फे सिंधुदुर्गनगरीच्या विकासाची नवनवीन संकल्पना मांडत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे; मात्र विकासाची दिशा भरकटत चालल्याने सद्यस्थितीत सिंधुदुर्गनगरीच्या विकासाची दशा ही दुर्दशेच्या दिशेने जातना दिसत आहे.

भरकटलेली नाव
विकासात प्रमुख भर घालणाऱ्या रस्ते, पाणी, वीज आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडलेले.

कचऱ्याचा प्रश्‍न भीषण
आठवडा बाजारची स्थिती अत्यंत दयनीय
बाजारशेड बांधूनही त्यातील सुविधांअभावी गेले दोन वर्षे वापरनाविना पडून
व्यापारी आणि ग्राहक बाजारशेड उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com