करूळ, भुईबावडा घाट डेंजर झोनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

वैभववाडी - गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खचलेल्या करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांच्या दुरूस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कायमस्वरूपी दुरूस्तीऐवजी या विभागाने गेल्या दोन दिवसापासून खचलेल्या रस्त्यालगत बॅरेल उभी करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मुसळधार पावसात रस्ता खचण्याची भीती वाढली आहे.

वैभववाडी - गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खचलेल्या करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांच्या दुरूस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कायमस्वरूपी दुरूस्तीऐवजी या विभागाने गेल्या दोन दिवसापासून खचलेल्या रस्त्यालगत बॅरेल उभी करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मुसळधार पावसात रस्ता खचण्याची भीती वाढली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूक असलेला करूळ घाट आणि त्याला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जाणारा भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. करूळ घाटात रस्ता चार ठिकाणी खचला आहे तर भुईबावडा घाटरस्ता दोन ठिकाणी खचला आहे. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात या दोन्ही घाटरस्ते खचले आहेत. त्यानतंर घाटरस्त्यांची पडझड सुरूच होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह घाटरस्त्यांची  पाहणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील दोन महिन्यात खचलेल्या रस्त्यांची पुर्नबांधणी करावी, अशा सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या; मात्र घाटरस्ता खचलेल्या प्रकाराला आता दहा महिने पूर्ण झाले आहेत. या दहा महिन्यांत बांधकाम विभागाला खचलेल्या घाटरस्त्यांच्या दुरूस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. 

मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता या रस्त्यांच्या दुरूस्तीकरीता दीड कोटींचा निधी शासनाने मंजूर केला असून महिनाभरात या कामांना सुरवात करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; परंतु आजमितीस घाटात खचलेल्या एकाही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. उलट गेल्या दोन दिवसांपासून रिकामी बॅरेलमध्ये दगड भरून ती बॅरेल खचलेल्या रस्त्यालगत उभी केली जात आहेत. खचलेले रस्ते अतिशय धोकादायक बनले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने सुरू केलेले तकलादु उपाय मोठ्या दुर्घटनेस आमत्रंण देणारे ठरणारे असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

बांधकाम विभागाने करूळ आणि भुईबावडा घाटांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. घाटरस्त्यांतील गटारामध्ये गेल्यावर्षी पडलेले दगडमाती अद्याप तसेच आहेत. त्यामुळे डोंगरावरून येणारे पावसाचे  सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. या पाण्यासोबत दगडमाती रस्त्यावर येत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे प्रकार सध्या घाटात घडत आहेत; करूळ, भुईबावडा घाट डेंजर झोनमध्ये परंतु बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करीत आहे.

दरम्यान, पावसाळ्यात खचलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करणे शक्‍य नसल्यामुळे या दोन्ही घाटमार्गाने प्रवास करणे जिकिरीचे ठरणार आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्याठिकाणी रस्त्याखालील भराव पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात असल्यामुळे रस्ता अधिक खचण्याची शक्‍यता आहे.

मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का?
करूळ घाटात रस्ता चार ठिकाणी खचला आहे. या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक होत असते. रस्ता पुर्नबांधणीला जर वेळ लागणार असेल तर तात्पुरते आणि भक्कम पर्याय बांधकाम विभागाकडे उपलब्ध आहेत, तशा कोणत्याही पर्यायाचा वापर करताना बांधकाम विभाग दिसत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर शासनाला जाग येते. तशाच एखाद्या मोठ्या दुर्घटनेची बांधकाम विभागाला प्रतीक्षा आहे का असा प्रश्‍न वाहन चालकांतून विचारला जात आहे.

काय आहेत पर्याय
यापूर्वी घाटातील खचलेल्या रस्त्यांची पुर्नबांधणी गॅबियन पद्धतीने केली गेली आहे. विशिष्ट पद्धतीने दगड रचून बांधकाम केले जाते. या दगडातून पाणी सहजपणे झिरपत असल्यामुळे कोणताही धोका बांधकामाला येत नाही. अशा पद्धतीने केलेले बांधकाम घाटरस्ते टिकविण्याकरीता चांगला पर्याय मानला जातो. विशेष म्हणजे या कामाला अतिशय माफक खर्च येतो. रस्ता खचलेली छोटी भगदाडे आत्ता गॅबियन पद्धतीने बांधल्यास रस्ता टिकविण्याच्यादृष्टीने त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. 

Web Title: Sindhudurg Nagari news Ghat Danger Zone