सिंधुदुर्गात वादळी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांचाही तडाखा बसला. आज दुपारनंतर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. 

कणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांचाही तडाखा बसला. आज दुपारनंतर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. 

कणकवली तालुक्‍यात वीज खंडित 
कणकवली परिसरात काही काळ जोरदार वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे तालुक्‍यातील बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला. महामार्गावर वागदे येथे झाड उन्मळून पडून काही काळ वाहतूक ठप्प होती. जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील झाड रस्त्यावर उन्मळून पडले होते. वादळी वाऱ्यामुळे कणकवली परिसरात झाडे उन्मळून पडून वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. रविवारी मध्यरात्री अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. आज दिवसभर वीज येत जात होती. काही भागात मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाल्यांची पूरसदृश्‍य स्थिती होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 25.88 मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. 

मुसळधार पावसाचा अंदाज 
जिल्हाभरात पावसाचा जोर वाढला असून काही भागात पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोरही वाढला आहे. दुपारनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही भागात मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामाला जोर आला आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत व कंसात आतापर्यंत तालुकावार झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः दोडामार्ग-16 (824), सावंतवाडी- 54 (755), वेंगुर्ला- 16.4 (755.87), कुडाळ- 26 (647), मालवण- 00 (636.4), कणकवली- 34 (775), देवगड- 10 (619) आणि वैभववाडी- 51 (501). आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 689.15 मिलिमीटर इतका पाऊस कोसळला आहे. अरबी समुद्रातील वातावरणात बदल झाल्याने पावसाचा जोर वाढत आहे. 

बाजारात धडकल्या लाटा 
मालवण ः गेले काही दिवस तालुक्‍याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने आज दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील मेढा-कोथेवाडा येथे मोठा आंब्याचा वृक्ष कोसळला. त्याने दगडी कुंपण तुटून नुकसान झाले. सायंकाळी पावसाचा जोर ओसरला होता. समुद्र खवळण्यास सुरवात झाली असून आज किनाऱ्यावर भरणाऱ्या सोमवारच्या आठवडा बाजारात समुद्राच्या लाटा धडकल्याने व्यापारी व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. यामध्ये काही व्यापाऱ्यांचा माल समुद्रात वाहून गेल्याने नुकसान झाले. 

रविवारी रात्री कोसळलेल्या पावसाने आज सकाळच्या सत्रात दांडी मारल्यानंतर सायंकाळी अधूनमधून हजेरी लावली. सायंकाळी ढगाळ वातावरण होते; मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शहरातील मेढा-कोथेवाडा येथे ग्रामीण रुग्णालय परिसरामागील गोसावी यांच्या जागेतील आंब्याचा मोठा वृक्ष कोसळला. हा वृक्ष शेजारील आनंद पारकर यांच्या जागेत पडून पारकर यांचे दगडी कुंपण कोसळून नुकसान झाले. 

मालवणसह दांडी, रॉकगार्डन या किनारपट्टीवर खवळलेल्या समुद्राच्या लाटा जोरदारपणे धडकत होत्या. रॉकगार्डन परिसरातील खडकाळ भागात उसळत्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी उत्साही नागरिकांनी गर्दी केली होती. 

शेतीची कामे खोळंबली 
सावंतवाडी ः तालुक्‍यात आज पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागाला झोडपले. तालुक्‍यात किरकोळ पडझडीचे सत्र सुरू होते. तालुक्‍यात 54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काल रात्री विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी अकरानंतर पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. ईदनिमित्त आज सुटी असल्याने विद्यार्थ्यासह सरकारी कर्मचारी वर्गाने घरी होते. त्यामुळे जनजीवनावर फारसा परिणाम जाणवला नाही; परंतु शेती कामे खोळंबली. पावसातही अनेक शेतकरी कामे उरकतानाचे चित्र होते. आजही काही भागात किरकोळ पडझडी व अपघात होण्याचे सत्र सुरू होते. गेल्या दोन दिवसात तालुक्‍यात दमदार पाऊस झाला असून काल 60 तर आज 54 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दमदार पाऊस सुरूच होता. 

Web Title: Sindhudurg Nagari news rain