काजू उत्पादनात यंदा ३० ते ४० टक्के घट

भूषण आरोसकर
मंगळवार, 13 मार्च 2018

काजू हाती किती लागणार व त्यातून उत्पन्न हाती किती मिळणार याची बागायतदारांना तर प्रक्रियेसाठी कारखान्यात किती काजू दाखल होणार अशी चिंता प्रक्रिया उद्योजकांना लागली आहे. काजूवर पीक व दर निश्‍चितेबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसून येत आहे.

सावंतवाडी - काजू घटलेली आवक बागायतदार व प्रक्रिया उद्योजकांना डोकेदुखी ठरत आहे. पहिल्या टप्प्यात चित्र पाहता ३० ते ४० टक्‍क्‍याने उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे.

काजू हाती किती लागणार व त्यातून उत्पन्न हाती किती मिळणार याची बागायतदारांना तर प्रक्रियेसाठी कारखान्यात किती काजू दाखल होणार अशी चिंता प्रक्रिया उद्योजकांना लागली आहे. काजूवर पीक व दर निश्‍चितेबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसून येत आहे.

सध्याचे चित्र लक्षात घेता काजू दराबाबत प्रक्रिया उद्योजक संभ्रमावस्थेत आहेत. पूर्ण उत्पन्नही हाती आले नसल्यामुळे काजू सर्व अवस्थेतून गेल्यावर कारखान्यात किती दराने येऊन पडेल हे नक्की सांगणे कठीण आहे. काजूचे उत्पादन घटले तरी मध्यंतरीच्या काळात मोहोर आल्यास किंवा काजुला अनुकूल ठरल्यास त्याचा फायदा बागायतदारांना होऊ शकतो.
- सुरेश बोवलेकर,
काजू प्रक्रिया उद्योजक

वातावरणातील बदलामुळे काजू पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. फळधारणा उशिराने झाली. थंडीचा कालावधीही जास्त राहिला. वातावरणातील हे बदल काजू पिकाला मारक ठरले. मोहोर करपला गेला. यावर टी मॉस्कीटोचा प्रभाव जाणवला. जिल्ह्यातील सर्वच भागात हे चित्र होते. १५ ते २० दिवसांनी हंगामाचा कालावधी लांबला.

सध्याची काजूची असलेली आवक व दर याचे समीकरण योग्य सांगता येत नाही. आपला काजू जगप्रसिद्ध आहे. मात्र आवक असल्याने बाहेरूनही आयात करावी लागते. वातावरणीय बदलाच्या फटक्‍यामुळे ५५ ते ६० टक्के उत्पन्न हाती लागण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यानी काजू बागायतीत मिश्र पिके घ्यावीत तसेच सेंद्रिय खतांचा वापर करावा.
- बाळासाहेब परूळेकर,
अध्यक्ष, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्‍ट 
ऑरगॅनिक फार्मर फेडरेशन

जिल्ह्यात ६६ हजार ७०० हेक्‍टर क्षेत्रावर काजु बागायती आहेत. पड क्षेत्रातील ३ हजार हेक्‍टर नवीन क्षेत्र काजु लागवडीखाली आले आहे; मात्र काजू पिकाला मोठ्या संघर्ष करण्याची वेळ  बागायतदारांवर आली आहे. हा हंगाम आता २० ते २५ दिवस उशिराने चालणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मे अखेरपर्यंत शेवटचा काजु झाडावर असेल असा अंदाज आहे.

थंडीचा कालावधी जास्त राहिला तसेच फळधारणाही उशिराने झाली. उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येणार आहे. काजुची गरज यंदा आणखी लागणार असल्याची शक्‍यता आहे. टी मॉस्कीटोचा प्रादुर्भाव जिल्ह्यात बऱ्यापैकी जाणवला होता.
- डॉ. राकेश गजभिये,
काजू अभ्यासक

आंबा पिकासाठी बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात देखभाल करण्यात येते; मात्र काजुकडे देखभालीसाठी फारसा लक्ष घालण्यात येत नाही. याचाच दुष्परिणाम भोगण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. यासाठी आता काजुवर पिक फवारणी व पिकाची काळजी घेत असल्याचे चित्र अलिकडेच दिसून येत होते. काजू पिकावरील वातावरणीय बदल काजु पिकाचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी १८० च्याही पुढे किलोचा दर आहे. या काळात सर्वसाधारण १६० ते १६५ पर्यंत दर असतो. काजू हंगाम संपेपर्यंत दरही चढाच राहण्याची शक्‍यता आहे. याचा जास्त फटका प्रक्रिया उद्योगांना बसू शकतो.

जिल्ह्यात काजुचे २२०० च्या आसपास कारखाने आहेत. येथे चांगला काजू मिळत असूनही तो या उद्योगांना पुरत नाही. देशात आणि राज्यात कच्च्या काजुची मोठी गरज आहे. १९ लाख टन काजुची गरज देशात आहे; मात्र प्रत्यक्षात ८ लाख टन काजु प्राप्त होतो. याचा विचार करता काजुचे दरही वाढीवच राहणार आहेत.

गेल्याच महिन्यात आयात शुल्कात केंद्र सरकारने घट केली. आयात काजुचा दर कमी होवून त्याचा फायदा काजु उद्योजकांना होणार असा विचार करण्यात आला. याच्या नेमकेपणावर साशंकता असली तरी स्थानिक काजुदरात वाढ व आयात काजुदरातील घट यामुळेही या उद्योगाचे आर्थिक गणीत सध्यातरी संभ्रमावस्थेत आहे. स्थानिक काजू व परदेशी काजु प्रक्रिया उद्योगासाठी किती फायदेशीर ठरतो असाही विचार प्रक्रिया उद्योजकाकडून करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

बदलत्या वातावणाचा फटका जरी काजु पिकाला बसला असला तरी दुसऱ्या टप्प्यात येणारा मोहोर व अनुकुल वातावरण राहिल्यास उर्वरीत ७५ टक्के पिक हाती मिळण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. फायदा बागायतदारांना होण्याची शक्‍यताही कृषी तज्ञाकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे काजु व काजुचे दर, प्रक्रिया उद्योजक, यासर्वामध्ये उत्पन्नाची आर्थिक गणिते घालण्याचे चित्र अद्याप तरी स्पष्ट नसल्याचे जाणवते.

Web Title: Sindhudurg News 30-40 percent decline in cashew production