कणकवलीत नळयोजनेला वर्षाला ३५ लाखांचा तोटा

राजेश सरकारे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कणकवली - येथील नगरपंचायतीची नळयोजनेला वर्षाला तब्बल ३५ लाख ११ हजार रुपयांचा तोटा होत आहे. हा खर्च नगरपंचायत फंडातून भरला जात आहे. शहरात १५७१ नळकनेक्‍शन ग्राहक असून त्यांना प्रतिदिनी २० लाख लिटर पाणी पुरविले जात आहे. 

कणकवली - येथील नगरपंचायतीची नळयोजनेला वर्षाला तब्बल ३५ लाख ११ हजार रुपयांचा तोटा होत आहे. हा खर्च नगरपंचायत फंडातून भरला जात आहे. शहरात १५७१ नळकनेक्‍शन ग्राहक असून त्यांना प्रतिदिनी २० लाख लिटर पाणी पुरविले जात आहे. 

नळयोजना चालविण्यासाठी वर्षाकाठी ४७ लाख ७४ हजार रुपये खर्च होत असून केवळ १२ लाख ६२ हजार एवढेच उत्पन्न मिळत आहे. हा जमा आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टीत दीडपट ते दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीने केला आहे. पुढील नगरपंचायत सभेत याला मंजुरी मिळाल्यानंतर महिन्याला १०० ते १५० रुपये पाणीपट्टी ग्राहकांना भरावी लागणार आहे. याखेरीज जेवढा जास्त पाण्याचा वापर तेवढी पाणीपट्टी अधिक असा नव्या पाणीपट्टीचाही फॉर्म्युला नगरपंचायतीकडून केला जात आहे.

सन २००६ पर्यंत प्रत्येक ग्राहकाकडून महिन्याला १२ रुपये पाणीपट्टी आकारली जात होती. तर सध्या महिन्याला ७० रुपये पाणीपट्टीची आकारणी होत आहे. शहरा लगतच्या गावांमध्ये महिन्याला शंभर रुपये पाणीपट्टी तर नगरपालिका क्षेत्रामध्ये सरासरी दीडशे रुपये पाणीपट्टी घेतली जात आहे. शहरातील ग्राहकांकडून मात्र सर्वांत कमी दराने पाणीपट्टीची आकारणी होत आहे. नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे.

शहरात मुडेश्‍वर मैदानासमोरील डोंगरावरील मुख्य टाकी ५ लाख लिटरची आहे. याखेरीज कलमठ आणि बांदकरवाडी येथील टाकीची क्षमता ३ लाख ५० हजार लिटरची आहे. तर शिवाजीनगर येथील पाण्याची टाकी ४ लाख लिटरची आहे. या सर्व टाक्‍यांच्या माध्यमातून शहरातील १५७१ नळ कनेक्‍शनधारक आणि ३० सार्वजनिक स्टॅण्डपोस्ट येथे २० लाख लिटर म्हणजे प्रती नळकनेक्‍शन धारकांना दिवसाला १२५० लिटर पाणी पुरवठा केला जात आहे.

पाणीपट्टी दरवाढ हा मतदारांवर परिणामकारक घटक आहे. त्यामुळे नळयोजना सुरू झाल्यापासून जमा आणि खर्चाच्या ताळमेळ घालण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र, हा तोटा नगरपंचायत फंडामधून नगरपंचायतीला सहन करावा लागत आहे. राज्यातील बहुतांश सर्वच नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या नळयोजना तोट्यात आहेत. मात्र हा तोटा किमान असावा यासाठी नगरपंचायतीने पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वर्षाला ८०६ रुपये असणारी पाणीपट्टी पुढील आर्थिक वर्षापासून १५०० ते १८०० रुपये होण्याची शक्‍यता आहे.

जलशुद्धीकरण यंत्रणा...
नव्या वर्षापासून शहरातील सर्व ग्राहकांना नगरपंचायतीतर्फे शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. जॅकवेल ते मुख्य टाकीपर्यंत नवीन पाइपलाइन आणि १०० अश्‍वशक्‍तीचे दोन पंप बसविण्यात आले आहेत. नळयोजनेच्या या आधुनिकीकरणामुळे सर्व टाक्‍या भरण्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागत आहे. त्यासाठी पूर्वी २४ तास लागत होते. तसेच उच्च अश्‍वशक्‍तीचे पंप बसविल्यामुळे महिन्याला ३० हजार रुपये वीज बिलात बचत झाल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

अशी होणार आकारणी...
योग्य आकारणी होण्यासाठी पाणी वापरानुसार पाणीपट्टी हे सूत्र ठरवून उपविधी केली जात आहे. यात महिन्याला १० हजार लिटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १५० रुपये पाणीपट्टी असणार आहे. त्यापुढील प्रत्येक हजार लिटर्स पाणी वापरासाठी पाणीपट्टी वाढत जाणार आहे. दरम्यान, नळपाणी पुरवठ्याचे अचूक मोजमाप होण्यासाठी शहरातील प्रत्येक नळकनेक्‍शनला पाणी मिटर बसविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. नळमीटर बसविण्याचे काम ७० टक्‍के पूर्ण झाले असून, फेब्रुवारीपर्यंत सर्व नळकनेक्‍शनला वॉटर मीटर बसविले जाणार असल्याची माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली.

पुरवठा योजनेचा जमा खर्च

  •  पाणीपट्टी उत्पन्न १२ लाख ६२ हजार ८८१
  • पाणी योजना खर्च ४७ लाख ७४ हजार ६३६

खर्चाचा तपशील...

  • वेतन : १४ लाख ३१ हजार ३०३
  • वीजबिल : २० लाख ५३ हजार १५०
  • टेंडर खर्च : ४ हजार ३२०
  • साहित्य खर्च : १ लाख ५२ हजार ३४९
  • जंतुनाशक खर्च : ६२ हजार ६४०
  • इतर सेवा खर्च : १० लाख ७० हजार ८७४
     
Web Title: Sindhudurg News 35 lakh rupees loss annually in Kankavali water project