सिंधुदुर्गात पस्तीसशे डंपर व्यावसायिक अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

सावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणाऱ्या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

सिंधुदुर्गात साधारण सात-आठ वर्षांपूर्वी कळणे मायनिंगसह इतर प्रकल्प सुरू झाले. यामुळे खनिज वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रकची, डंपरची गरज भासू लागली. जिल्ह्यातील अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज करून डंपर खरेदी केले; मात्र पुढच्या काळात काही खाणी बंद झाल्या, तर काही खाणींमध्ये खनिज वाहतुकीचे प्रमाण कमी झाले. या तुलनेत डंपरची संख्या जास्त असल्याने त्यांनी काम कुठे मिळवायचे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. गोव्यातील खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार डंपर गोव्यात वाहतुकीसाठी जोडले गेले.

जिल्ह्यातील व्यावसायिकांनी डंपर तेथील ठेकेदाराकडे सुपूर्द करायचे. त्या बदल्यात ठराविक रक्कम दिली जाणार असे डील यामागे असते.यावर्षी गोव्यातील खाण व्यवसाय १ ऑक्‍टोबरपासून सुरु झाला; मात्र तेथील उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेने दर वाढवून मिळावा या मागणीसाठी असहकार पुकारला आहे. त्यामुळे अद्याप खाणीबाहेरील बंदरापर्यंतची वाहतूक सुरु झालेली नाही. 

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने याच्या वाटाघाटी सुरू आहेत. यातच नुकतीच उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनांचे प्रतिनिधी, खाण व्यावसायिक यांची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झाली. यात संघटनांनी स्थानिक वाहन मालकांनाच काम देण्याची 
अट घातली. ज्या मार्गावर खनिज वाहतूक चालते त्यावरील रहिवासी वाहनधारकांचीच वाहने वाहतुकीसाठी वापरावीत ही सघटनेची अट या बैठकीत मान्य करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्गातील साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.

डंपरची संख्या वाढली
डंपर व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई होत असल्याचा भुलभुलैय्या मध्यंतरी निर्माण झाला. काहींच्या मते तो जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे २०११ च्या हंगामापूर्वी कळणे-रेडी परिसरासह जिल्हाभरातून शेकडो जणांनी डंपर खरेदीला सुरवात केली. आश्‍चर्य म्हणजे एरवी प्रामाणिक शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी अनेक अटी-शर्थी घालून शेतकऱ्याला हैराण करणाऱ्या बॅंकांनीही आपली तिजोरी डंपर कर्जासाठी खुली केली. वर्षभरातच जिल्ह्यात शेकडो डंपर रस्त्यावर आले.

डंपर व्यवसायाचा आर्थिक ताळेबंद
डंपर व्यवसाय हा हंगामी स्वरूपाचा आहे. त्यामुळे सहा महिनेच व्यवसाय अपेक्षित आहे. हप्ते मात्र वर्षभर भरावे लागतात. याचे मासिक आर्थिक गणित असे -

डंपरची किंमत- साधारण १६ लाख
बॅंक कर्ज हप्ता- ३० ते ४० हजार (मासिक)
करांची रक्कम (वार्षिक)- विमा- ३० हजार, व्यवसाय कर- दीड हजार
महाराष्ट्र कर- १२ हजार, पासिंग खर्च- १० हजार
एकूण- ५४ हजार (प्रतिमहिना साडेचार हजार)
वेतन-भत्ते- चालक वेतन- ८-१० हजार
दैनंदिन भत्ता- ३००० (मासिक)
क्‍लिनर- ३ हजार (मासिक)
एकूण खर्च- सोळा हजार (मासिक)
देखभाल व दुरुस्ती- १० हजार (मासिक)
एकूण खर्च- साधारण ६० हजार (मासिक)
(वर उल्लेखित खर्च हा संपूर्ण वर्षभराचा आहे; मात्र डंपर व्यवसाय हंगामी स्वरूपाचा असल्याने सहा महिन्यांच्या काळात वर्षभराच्या खर्चाएवढे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.)

Web Title: Sindhudurg News 3500 Damper businessman in problem