सिंधुदुर्गातील ३६२ ग्रामपंचायती मार्चअखेर होणार ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कणकवली - ‘डिजीटल इंडिया’च्या धर्तीवर राज्यात डिजीटल ग्रामयोजना सुरू झाली आहे. यात सिंधुदुर्गातील ३६२ ग्रामपंचायती नॅशनल ऑफ्टिक फायबर केबल नेटवर्कने जोडल्या जात आहेत. येत्या माचअखेर सहा तालुक्‍यांतील ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्यावर डिजीटल ग्राम सेवा सुरू होणार आहे.

कणकवली - ‘डिजीटल इंडिया’च्या धर्तीवर राज्यात डिजीटल ग्रामयोजना सुरू झाली आहे. यात सिंधुदुर्गातील ३६२ ग्रामपंचायती नॅशनल ऑफ्टिक फायबर केबल नेटवर्कने जोडल्या जात आहेत. येत्या माचअखेर सहा तालुक्‍यांतील ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्यावर डिजीटल ग्राम सेवा सुरू होणार आहे. पावसाळा असल्याने कामाचा वेग कमी होता. मात्र, मार्चमध्ये पहिल्या फेजमधील काम पूर्ण होईल, अशी माहिती बीएसएनएलच्या कोल्हापूर विभागाचे प्रभारी व्यवस्थापक व्ही. जी. पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात जी कामे सुरू होती, ती सर्व कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. बहुतांशी ठिकाणी केबलची कामे पूर्ण झाली. शहरालगतच्या ५० हून अधिक ग्रामपंचायती नोफाने जोडल्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी केबल टाकण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र मार्च २०१८ ला हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. 

केंद्रातील तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात ग्रामपंचायत कार्यालय इंटरनेट सेवेने जोडण्याचा निर्णय झाला होता. त्याची तयारी सुरू झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला. डिजिटल ग्राम योजनेला गती देण्यात आली आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही योजना राबवण्याचा संकल्प केला असून, पुढील तीन वर्षांत राज्यातील २७ हजार  ९०६ ग्रामपंचायती टप्प्याटप्प्याने जोडल्या जाणार आहेत. 

सिंधुदुर्गातील जवळपास ५० टक्के ग्रामपंचायतींपर्यंत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, पावसाळा संपल्याने पुढील काम वेगाने करून ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना ज्या पद्धतीने राबवली, त्याप्रमाणे डिजिटल ग्राम योजना राबवली जाणार आहे. जेणेकरून शहर आणि गाव यांच्यातील तंत्रज्ञातील अंतर कमी केले होईल. भारत ब्रॉडबॅन्ड नॅशनल लिमिटेड या सरकारी कंपनीतर्फे नॅशनल ऑफ्टिक फायबर केबल नेटवर्कचे काम पाहिले जात आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वैभववाडी आणि दोडामार्ग तालुके वगळून सहा तालुक्‍यांतील ३६२ ग्रामपंचायती नोफाने जोडल्या जाणार आहेत. 

जिल्ह्यात बीएसएनएलतर्फे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत तालुक्‍यातील सर्व गटविकास कार्यालये त्या त्या तालुक्‍यातील ग्रामपंचायतींशी जोडली जाणार आहेत. ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात शंभर एमबीपीएस डाटा देण्याची तरतूद आहे. गावात केबल गेल्यानंतर ग्रामपंचायती वाय-फाय सेवा सुरू करू शकतात. या योजनेच्या पुढील टप्प्यात गावातील सर्व शाळा आणि आरोग्य केंद्रांना केबल नेटवर्कने जोडले जाणार आहे. गावात सायबर कॅफेही सुरू करण्याची संधी बेरोजगारांना मिळणार आहे.

Web Title: Sindhudurg News 362 Garm panchayat will online at end of March