४०० पैकी पाच होड्या अधिकृत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मालवण - येथील बंदरात ४०० पर्यटन प्रवासी होड्या असताना यातील केवळ पाचच होड्याधारकांनी अधिकृत परवाना घेतल्याचे निदर्शनास आल्याने आपल्याला आश्‍चर्य वाटले. त्यामुळे यापुढे अनधिकृतपणे पर्यटन व्यवसाय करता येणार नाही, असे स्पष्ट करतानाच पर्यटन व्यावसायिकांना आवश्‍यक परवानग्या घेण्यासाठी अडीच महिन्यांची डेडलाईन आज प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी दिली.

येथील बंदर कार्यक्षेत्रातील जलक्रीडा प्रकल्प, नौकाविहार व सर्व प्रकारच्या जलप्रवासी वाहतूकदारांची महत्त्वाची बैठक आज येथील नगर वाचन मंदिरात झाली. बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, बंदर निरीक्षक एस. आर. वेंगुर्लेकर, आर. जे. पाटील, सहायक बंदर निरीक्षक ए. आर. गोसावी, टी. जी. मसके, सर्व्हेअर सुधाकर श्रीवास्तव, एस. यु. कदम, ए. एस. गावकर, एस.एन. नार्वेकर, डी. एस. चोडणेकर, एस. एम. बोवलेकर, एस. आर. मिठबावकर, श्री. नाईक आदी उपस्थित होते.

व्यावसायिकांतर्फे मेघनाद धुरी, संजय केळुसकर, रूपेश प्रभू, देवानंद चिंदरकर, सहदेव बापर्डेकर, दामोदर तोडणकर, बाबली चोपडेकर, मंगेश सावंत यांनी समस्या मांडल्या. जिल्ह्याच्या किनारपट्टी तसेच खाडीपात्रात बंदी कालावधीत जलक्रीडा व्यवसाय सुरू असल्याचे दिसल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी कारवाई केली जाईल.

जलप्रवासी वाहतूक, जलक्रीडा प्रकार २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. कर्ली खाडीपात्रात देवबाग, तारकर्ली, कोळंब खाडीपात्रात जलक्रीडा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार संबंधितांना जलक्रीडा व्यवसाय बंद करून होड्या किनाऱ्यावर काढण्याचे आदेश दिले. बंदी कालावधीत प्रवासी वाहतूक व जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही ही कारवाई सुरू राहील असे कॅप्टन नाईक यांनी सांगितले. पैसे भरल्यानंतर सर्व्हेअर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. इन्शुरन्स कंपनीकडून मिळत असलेल्या असहकार्याबद्दल शासनाचे लक्ष वेधले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg News 5 boats have only permission