फोंडाघाटात ४३ ठिकाणी अपघातांना आमंत्रण

एकनाथ पवार
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

वैभववाडी - कित्येक वर्षापूर्वी जुन्या पध्दतीने बांधकाम केलेले दगडी कठडे जीर्ण झाले आहेत. संरक्षक भिंतीही कोसळत आहेत. तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्यालगत सहाशे ते सातशे फुट खोल दरी असलेली तब्बल ४३ ठिकाणे मोकळीच आहेत. त्यापैकी ११ ठिकाणे तर धोकादायक आहेत.

वैभववाडी - कित्येक वर्षापूर्वी जुन्या पध्दतीने बांधकाम केलेले दगडी कठडे जीर्ण झाले आहेत. संरक्षक भिंतीही कोसळत आहेत. तीन ते चार ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्यालगत सहाशे ते सातशे फुट खोल दरी असलेली तब्बल ४३ ठिकाणे मोकळीच आहेत. त्यापैकी ११ ठिकाणे तर धोकादायक आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दहा किलोमीटर लांबीच्या फोंडा घाटरस्त्याची ही दयनीय अवस्था आहे.

देवगड-निपाणी राज्यमार्गावरील या घाटाची रचना अतिशय चांगली आहे; परंतु आंबेनळीच्या घाटातील दुर्घटनेनंतर सर्वेक्षण केल्यानंतर हा घाटही सुरक्षित राहिलेले नाही. संरक्षक कठड्यात वाहन रोखण्याची शक्ती नाही. अलीकडे या घाटातील तीन संरक्षक भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणाहुन तर ट्रक कोसळला होता. या घाटरस्त्यात क्रॅश बॅरियर्सचा वापर किरकोळ स्वरूपात केला आहे. दहापैकी साडेचार किलोमीटर घाटरस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या घाटात ठोस उपायांची गरज आहे.

दरीकडील बाजुस ४३ ठिकाणांवर क्रॅश बॅरियर्स बसविण्याची गरज आहे. त्यातील अकरा ठिकाणावर तर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. जीर्ण आणि ठिसुळ झालेले संरक्षक कठड्यांच्या पुर्नबांधणीच्या दृष्टीने बांधकाम विभागाने ठोस पावले उचलणे उचित ठरणार आहे. खचलेल्या रस्त्यांना तात्पुरत्या दुरूस्तीचा मुलामा न देता कायमस्वरूपी पुर्नबांधणी आवश्‍यक आहे.

आंबेनळी दुर्घटनेनंतर शासन जागे
आंबेनळी घाटातील दुर्घटनेनंतर राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील सर्व घाटरस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणाचे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसात हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येण्याची शक्‍यता आहे.

देवगड-निपाणी मार्गाच्या नुतनीकरणासाठी १२० कोटी रूपये मंजूर आहेत. यामध्ये रस्ता नुतनीकरण, गटारांची बांधणी, संरक्षक भिंती बांधणे यासह फोंडाघाटातील विविध कामांचा समावेश आहे. या कामांची निवीदाही काढलेली होती; परंतु या कामांची निवीदा कुणीही भरलेली नाही. दहा वर्षाच्या देखभाल दुरूस्तीचा समावेश निवीदेत आहे. फोंडा घाटरस्त्यालगत धोकादायक ठिकाणी क्रॅश बसविण्याबाबतचा अहवाल पाठविला आहे. याशिवाय धोकादायक ठिकाणी तात्पुरते उपाय केलेले आहेत.
- शैलेश मोरजकर, 

शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली

दृष्टिक्षेपात फोंडाघाट

  •  दहा किलोमीटर लांबीचा घाटरस्ता
  •  रस्त्यालगत सहाशे ते सातशे फुट खोल दरी
  •  दरीच्या बाजुला ४३ ठिकाणे मोकळीच
  •  ११ ठिकाणे अतिशय धोकादायक
  •  जीर्ण कठडे मोजतायत अखेरच्या घटका
  •  संरक्षक भिंतीही खचल्या आहेत
     
Web Title: Sindhudurg News Accident spots in PhodaGhat