बंदूक बनवणाऱ्या कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

सावंतवाडी - माणगाव-कुंभारवाडी येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या बंदुका बनविण्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. तेथून १२ बंदुकांसह त्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

सावंतवाडी - माणगाव-कुंभारवाडी येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या बंदुका बनविण्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. तेथून १२ बंदुकांसह त्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी आप्पा कृष्णा धुरी (वय ४३) याला ताब्यात घेतले आहे. हा छापा आज दुपारी तीनच्या दरम्यान टाकण्यात आला.
माणगाव-कुंभारवाडी येथे आप्पा धुरी याच्या मालकीचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या आडून तो ठासणीच्या बंदुका तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला मिळाली.

पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी तीनच्या दरम्यान धुरी याच्या कारखान्याच्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे तयार असलेल्या चार ठासणीच्या बंदुका सापडल्या. तसेच अन्य आठ बंदुकांचे सुट्टे भाग जोडण्यात आले नव्हते. याशिवाय बंदुका तयार करण्यासाठीचे वेल्डिंग मशीन, ग्राईंडर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. उशिरापर्यंत त्याची मोजदाद सुरू होती.

याप्रकरणी संशयित धुरी याला हत्यार अधिनियमानुसार ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक शाहू देसाई, सुभाष खंदारे, सुधीर सावंत, आशिष गंगावणे, प्रवीण वालावलकर, मनोज राऊत, रवी इंगळे, विजय तांबे, अमित तेली, प्रसाद चव्हाण, शीतल नांदोस्कर यांच्या पथकाने केली. ही माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
इतक्‍या मोठ्या प्रमाणात हत्यार बनविणाऱ्या कारखान्याविरुद्ध गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे. संशयिताकडे मिळालेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितावर हत्यार अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी दिली.

Web Title: Sindhudurg News action on gun making factory