सिंधुदुर्ग किल्ल्याचे आता हवाई दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मालवण - समुद्रातील दुर्ग-किल्ल्यांच्या हवाई दर्शनाचा आनंद पर्यटकांना लुटता यावा, यासाठी येथे हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन उपक्रम १९ व २० मे रोजी राबविण्यात येणार आहे. कोकणात हवाई पर्यटनाचा हा असा पहिलाच उपक्रम असून यातून पर्यटनाचे केंद्रबिंदू असणाऱ्या मालवणचे पर्यटन एक वेगळ्या उंचीवर पोचणार आहे.

मालवण - समुद्रातील दुर्ग-किल्ल्यांच्या हवाई दर्शनाचा आनंद पर्यटकांना लुटता यावा, यासाठी येथे हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन उपक्रम १९ व २० मे रोजी राबविण्यात येणार आहे. कोकणात हवाई पर्यटनाचा हा असा पहिलाच उपक्रम असून यातून पर्यटनाचे केंद्रबिंदू असणाऱ्या मालवणचे पर्यटन एक वेगळ्या उंचीवर पोचणार आहे. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून हा साहसी उपक्रम भविष्यात विस्तारित केला जाईल, अशी माहिती पुण्याचे माजी नगरसेवक व हेलिकॉप्टर राईडचे ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली दारवटकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

येथील हॉटेल सागर किनारा येथे पत्रकार परिषद झाली. या वेळी नकुल पार्सेकर, पर्यटन उद्योजक अन्वय प्रभू, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, रूपेश प्रभू, रश्‍मीन रोगे आदी उपस्थित होते. श्री. दारवटकर म्हणाले, ‘‘याआधी पुणे सिंहगड येथे हवाई दर्शनचा प्रयोग यशस्वी झाला. त्याअनुषंगाने सह्याद्रीच्या पट्ट्यातील गड किल्ले व समुद्रातील दुर्ग किल्ले यांचेही विहंगम दृश्‍य पर्यटकांना पाहता यावे, यासाठी हेलिकॉप्टर राईड सुरू करण्याचा विचार येथील नकुल पार्सेकर यांच्याकडे मांडला. याला जलपर्यटन उद्योजक अन्वय प्रभू व त्यांच्या सहकाऱ्यांनीही पाठिंबा दिला.

१९ व २० मे रोजी हेलिकॉप्टरद्वारे पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन घडविले जाणार आहे. यासाठी आवश्‍यक सर्व विभागांच्या परवानग्या मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच हा उपक्रम सुरू केला जाईल. यासाठी एरोलीप या कंपनीच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उपलब्ध केले जाईल. शहरातील देऊळवाडा पेट्रोल पंपसमोरील मोकळ्या जागेतून हेलिकॉप्टर उड्डाण होईल. तेथून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गावर हे हेलिकॉप्टर आठ या अंकाच्या आकारात फेऱ्या मारल्या जातील. या उपक्रमाची जबाबदारी अन्वय प्रभू यांच्याकडे सोपविली आहे. या हेलिकॉप्टर राईडसाठी प्रत्येक पर्यटकामागे साडेपाच हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.’’

शिवराजेश्‍वर मंदिरावर पुष्पवृष्टी संधी
पुरातत्त्व खाते व वायरी भूतनाथ ग्रामपंचायत यांच्या परवानगीने हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्‍वर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याची संधीही पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाईल, असे श्री. पार्सेकर म्हणाले.

Web Title: Sindhudurg News aerial viewing fort of Sindhudurg