प्रमोद जठारांचा पुतळा गिर्ये ग्रामस्थांनी जाळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

देवगड -  ‘होय’ भारतीय जनता पक्षानेच कोकणात रिफायनरी प्रकल्प आणला, या भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या जाहीर वक्‍तव्याचे पडसाद आज तालुक्‍यातील गिर्ये, रामेश्‍वर परिसरात उमटले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जठार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

देवगड -  ‘होय’ भारतीय जनता पक्षानेच कोकणात रिफायनरी प्रकल्प आणला, या भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या जाहीर वक्‍तव्याचे पडसाद आज तालुक्‍यातील गिर्ये, रामेश्‍वर परिसरात उमटले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जठार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या वेळी ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्‍त करताना श्री. जठार यांनी गिर्ये परिसरात जाहीर सभा घेऊन प्रकल्पाबाबत बोलावे, असेही सांगितले. तालुक्‍यातील गिर्ये, रामेश्‍वर  परिसरासह रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात सध्या रान उठले आहे. असे असताना प्रमोद जठार यांनी जामसंडे येथे ‘होय’ भारतीय जनता पक्षानेच कोकणात रिफायनरी प्रकल्प आणला, असे जाहीर केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 

राज्य कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटनानिमित्त आलेल्या श्री. जठार यांनी प्रकल्प भाजपनेच आणल्याचे जाहीर करून विरोधाच्या आगीत जणू तेलच टाकले होते. त्याचा आता गिर्ये, रामेश्‍वर परिसरात चांगलाच भडका उडाल्याचे चित्र होते.

श्री. जठार यांच्या वक्‍तव्याचा स्थानिक ग्रामस्थांनी आज समाचार घेतला. या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या. संतापलेल्या ग्रामस्थांनी श्री. जठार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे या वेळी दहन करून त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध नोंदविला.

‘गिर्ये परिसरात सभा घेऊन जठारांनी जाहीर करावे’
प्रमोद जठार प्रकल्प होणार असल्याचे सांगत असतील तर त्यांनी गिर्ये परिसरात सभा घेऊन तसे जाहीर करावे. त्या वेळी त्यांना स्थानिकांचा काय रोष आहे, तो समजेल. श्री. जठार यांना प्रकल्प करायचाच असेल तर त्यांनी तो अन्यत्र करावा. मात्र, गिर्ये परिसरात प्रकल्प करायचा असल्यास त्यांनी येथे येऊन स्थानिकांशी बोलावे, अशाही ग्रामस्थांच्या भावना होत्या.

Web Title: Sindhudurg News agitation against Green refinery