#MarathaKrantiMorcha सिंधुदुर्गात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

सिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले.

सिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले.

तालुक्‍याची ठिकाणे आणि प्रमुख शहरात उत्स्फूर्त मोर्चे निघाले. मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे आंदोलकांवर लाठीमार झाला. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिस कर्मचाऱ्याचे अनुद्‌गार आणि पोलिस अधीक्षकांनी दिलेला इशारा यामुळे आंदोलन चिघळण्याची स्थिती होती.

जिल्ह्यातील एसटी बससेवा आणि खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवासी आणि नागरिकांचे हाल झाले. शाळा, महाविद्यालये देखील बंद होती. कडकडीत बंद असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंसाठी नागरिकांची कोंडी झाली. सायंकाळी पाच नंतर दुकाने, हॉटेल्स काही प्रमाणात सुरू झाल्याने दिलासा मिळाला.

काल (ता. २५) मध्यरात्रीपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडाला होता. पहाटेपासूनच ठिकठिकाणी टायर पेटवून, झाडे तोडून रस्ते बंद करण्यात आल्याने देवगड तालुक्‍यासह अनेक गावांतील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दहापासून जिल्ह्यात सर्वत्र मराठा समाजातर्फे ‘एक मराठा लाख मराठा’ अशी हाक देत निषेध मोर्चा काढण्यात आले. यात मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

दिवसभरात खारेपाटण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, देवगड, वैभववाडीसह कनेडी, वागदे, फोंडाघाट, नांदगाव, शिरगाव, आचरा येथे ठिय्या आंदोलन, रास्ता रोको केला जात होता. सातत्याने टायर पेटवून, झाडे तोडून रस्ते बंद केले जात होते. पेटते टायर आणि रस्त्यावरील अडथळे बाजूला करताना पोलिस यंत्रणेची धावपळ उडत होती. कुडाळमधील युवकावर लाठीमार झाल्याने जिल्ह्यातील वातावरण तंग झाले. पोलिस निरीक्षकांनी दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतर तणाव निवळला.

 

Web Title: Sindhudurg News agitation for Maratha Reservation