शिरोडात वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

वेंगुर्ले - शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्ण त्रस्त आहेत. याविरोधात आज शिरोडा पंचक्रोशी आरोग्य सेवा संघर्ष समिती आक्रमक झाली. पंचायत समिती सदस्य सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ घालत धारेवर धरले. 

वेंगुर्ले - शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्ण त्रस्त आहेत. याविरोधात आज शिरोडा पंचक्रोशी आरोग्य सेवा संघर्ष समिती आक्रमक झाली. पंचायत समिती सदस्य सिद्धेश ऊर्फ भाई परब यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ घालत धारेवर धरले. 

समितीने रस्ता रोकोचा इशारा दिल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांतर्फे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त होता. समितीने वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. डी. वजराठकर यांना जाब विचारला. शिरोडा रूग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्‍टर मिळावे, बंद असलेले शवागृह तात्काळ सूरू करावे, तीन वर्षे गोळ्या व औषधे रुग्णांना मिळत नाहीत, शिरोड्यामध्ये रक्तपेढी द्यावी, रूग्णांना अपुरी मिळणारी वैद्यकीय सेवा तात्काळ सुरळीत करावी, आदी मागण्या समितीने केल्या. 

रुग्णालयात डॉक्‍टरांची सात पदे असताना चार पदे रिक्त असून, तीन डॉक्‍टर कार्यरत आहेत. यामुळे होणारी गैरसोय परब यांनी मांडली. पुढील एका आठवड्यात एक वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात कार्यरत होतील, रक्तपेढी कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण लावून उपलब्ध साहित्य सामुग्रीची पूर्तता 2 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण होईल व त्यानंतर एफडीएचे प्रमाणपत्र आल्यानंतर त्वरित एक आठवड्यात रक्तपेढी सुरु होईल, असे लेखी आश्‍वासन डॉ. वजराठकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. 

1 ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्‍टोबरला रुग्णालय बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य निलेश ऊर्फ आबा मयेकर, विशाखा परब, प्राची नाईक, गुणाजी आमरे, ग्रामपंचायत आरोग्य समिती सदस्य शीतल साळगांवकर, ग्रामस्थ आनंद गडेकर, संजय आचरेकर, समीर जाधव, गौरव राऊत, प्रभाकर शिरोडकर, विठ्ठल परब, किशोर जाधव, चंदन हाडकी, नागश गोडकर, गौरेश राऊत उपस्थित होते. 

आरोग्य सभापतींवर टिकेचा रोख 
आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांचा शिरोडा परिसर हा मतदार संघ आहे. तेथील रुग्णालयाची ही दयनीय अवस्था असताना या आंदोलनाबाबत निवेदन देऊनही रुग्णालयात आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आरोग्य सभापती न आल्याने परब यांनी आरोग्य सभापती राऊळ यांच्यावरही निशाणा साधला. 
 

Web Title: Sindhudurg News agitation in Shiroda