सोनवडे-घोटगेवासीयांचे घाटमार्गासाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

कणकवली - सोनवडे-घोटगे घाटमार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली सोनवडे आणि घोटगे येथील ग्रामस्थांनी सोनवडे घाटमाथा पायथ्याशी आंदोलन केले. सुमारे चार तास हे आंदोलन सुरू होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी घाटमार्गाचे काम जानेवारी २०१९ पासून सुरू होईल, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

घाटमार्गाचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देत सोनवडे आणि घोटगे येथील नागरिकांनी आज सोनवडे येथे सकाळी दहापासून आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यासह सुभाष मडव, संदेश बिले, बाळा राणे, सत्यवान ढवळ, बाळा घाडी, चेतन ढवळ, बाळा गुरव, सुधीर नाईक, नीलेश कोरगावकर, अभिजित वंजारे, तेजस पिळणकर, देवीदास तेली यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सकाळी अकराला बांधकामचे उपअभियंता श्री. आवटी यांनी 
आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून निरुत्तर केले. यानंतर दुपारी दोनला बांधकामचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. बच्चे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आश्‍वासने नको, काम सुरू करा, अशीच भूमिका घेतली. अखेर श्री. बच्चे यांनी जानेवारी २०१९ पासून थेट कामाला सुरवात होईल, अशी लेखी ग्वाही दिली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सध्या पावसाळा सुरू असल्याने, तसेच तांत्रिक अडचणींमुळे घाटमार्गाचे काम सुरू करणे शक्‍य नाही. मात्र, पुढील सहा महिन्यांत घाटमार्गाच्या आवश्‍यक त्या सर्व परवानग्या घेणार आहोत. तसेच, जानेवारी २०१९ पासून घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
- सुरेश बच्चे,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

हे तर सत्ताधाऱ्यांचे अपयश
याबाबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, ‘‘सोनवडे-घोटगे घाटमार्गातील वनजमिनीसह सर्व अडथळे खासदार नारायण राणे यांनी दूर केले होते; परंतु गेल्या चार वर्षांत सत्ताधाऱ्यांना या घाटमार्गाचे पुढील काम सुरू करता आले नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांचे हे मोठे अपयश आहे.’’

Web Title: Sindhudurg News agitation for Sonavade - Ghotage Road