सौंदाळे ग्रामस्थांच्या उपोषणास सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

सिंधुदुर्गनगरी - सौंदाळे ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक अपहार व कामकाजातील अनियमीततेबाबत संबंधितांवर कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या देवगड गटविकास अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई या मागणीसाठी सौंदाळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर आजपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. 

सिंधुदुर्गनगरी - सौंदाळे ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक अपहार व कामकाजातील अनियमीततेबाबत संबंधितांवर कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या देवगड गटविकास अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई या मागणीसाठी सौंदाळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर आजपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. 

सौंदाळे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून सौंदाळे ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष वेधले आहे. तर सौंदाळे माजी सरपंच यांनी योजना कामात केलेल्या कथीत अपहाराबाबत चौकशी करून कारवाई करावी यासाठी सौंदाळे ग्रामस्थांनी यापूर्वी देवगड पंचायत समितीसमोर उपोषण केले. यावेळी देवगड गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र देवून संबंधी दोषींवर चौकशी करून पंधरा दिवसात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार 26 जानेवारीला सुरू केलेले उपोषण स्थगित करून प्रशासनाला सहकार्य केले होते; मात्र देवगड गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानुसार कोणतीच कार्यवाही केलेली नाही. माजी सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचारात अनेक गोष्टी फौजदारीस पात्र असूनही गटविकास अधिकारी यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केलेली आहे. शासनाच्या योजनातील निधी तसेच जनतेच्या सुविधा हडप करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार गटविकास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. शेतकरी ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत.

भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत सौंदाळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 

आंदोलनात सौंदाळे ग्रामस्थ चंद्रकांत पुजारी, विजय मिठबांवकर, रमाकांत राणे, विश्‍वनाथ राणे, संगीता गुरव, सरीता मुळम, दिपाली पातळे, सुहास कामतेकर यांच्यासह 50 महिला-पुरूष ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. 
 

Web Title: Sindhudurg News agitation in Soudale