‘ऑल आऊट’ मोहिमेत फितुरीचा अडसर

नंदकुमार आयरे
शुक्रवार, 9 मार्च 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ऑल आऊट मोहीम सुरू केली असली तरी यंत्रणेतील दोष आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे या मोहिमेची धार बोथट बनली आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ऑल आऊट मोहीम सुरू केली असली तरी यंत्रणेतील दोष आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे या मोहिमेची धार बोथट बनली आहे.

दीक्षितकुमार गेडाम यांनी पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. अनेक ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना काही प्रमाणात आळा बसला; मात्र अद्यापही काही अवैध दारू अड्डे सुरूच आहेत. जिल्ह्यात गावठी दारू उत्पादीत करण्याच्या व्यवसायाचे प्रमाण कमी असले तरी गोवा राज्यातून अवैधरीत्या आणल्या जाणाऱ्या दारूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याला यंत्रणेतील दोष आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे बळ मिळत आहे.

अवैध धंदेवाईकांचे खबरेच सरस
पोलिसांना अवैध धंद्याबाबत माहिती पुरविणाऱ्या खबऱ्यापेक्षा अवैध धंदेवाईकांचे खबरेच अधिक सरस असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस यंत्रणेला त्यांच्या खबऱ्यांमार्फत काही अवैध धंद्यांची खबर दिली जात असली तरी पोलिस पथकाची कारवाई होणार याची खबरही तेवढ्याच तातडीने धंदेवाईकांना मिळत असल्याने अनेक ठिकाणी छापा टाकूनही पोलिस पथकाला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. यामुळे आपल्याच कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात सीमा भागांमधील मार्गावर तपासणी नाके आहेत. गोवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तरीही जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याचे अनेक ठिकाणच्या कारवाईमुळे स्पष्ट होत आहे, असे असेल तर तपासणी नाक्‍यांचा उपयोग काय असा प्रश्‍न पडतो.

जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकामार्फत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अनेक ठिकाणी कारवाई झाली आहे; मात्र या कारवाईमुळे जिल्ह्यातील तपासणी नाक्‍यावरील तपासणीच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. एकतर काटेकोरपणे तपासणी होत नाही किंवा तेथील कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादानेच अवैध दारूचा मार्ग मोकळा करुन दिला जात आहे. हे यातून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात अवैध दारूधंद्यासह अन्य अवैध धंद्याविरोधी जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम कडक धोरण अवलंबत असले तरी त्यांच्याच यंत्रणेतील काही लाचखोर व्यवस्थेमुळे ही मोहिम यशस्वी होण्यात मर्यादा येत आहेत. खबऱ्यांमार्फत अवैध धंद्याची अचूक माहिती मिळूनही मोहिमेवर गेलेले कर्मचारी रित्या हाताने परत येत आहेत. काही कर्मचारी फितूर असल्याने कारवाईपूर्वीच अवैध धंदेवाईकांना कारवाईबाबत माहिती पोहोच होत आहे हे अनेक कारवाईतून दिसून आले आहे.

Web Title: Sindhudurg News all out campaign issue