आंबोलीत होणार हँड ग्लायडिंग, हॉट एअरबलूनसारखे साहसी खेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

वाफोली-डेगवे परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व बागायतदारांना प्रत्येक झाडामागे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. प्रथमच हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

सावंतवाडी : आंबोलीचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा आहे. त्यासाठी धबधब्यांचा विकास करण्यावरून हँड ग्लायडींग, हॉट एअरबलूनसारखे साहसी खेळ सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक स्थिरावले जावेत आणि त्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगार मिळावा या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

वाफोली-डेगवे परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व बागायतदारांना प्रत्येक झाडामागे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. प्रथमच हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्तांचे नुकसान होणार नाही असा विश्‍वास केसरकर यांनी व्यक्त केला. चांदा ते बांदा योजनेंतर्गत सांगेली येथे सुरू करण्यात येणार्‍या काथ्या सुविधा केंद्राचे भूमीपुजन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, पंचायत समिती सभापती रवि मडगावकर, प्रांताधिकारी खांडेकर, तहसिलदार सतिश कदम, काथ्या प्रकल्पाचे अधिकारी लिना बनसोडे, गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राजन पोकळे, अभय किनळोसकर, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी केसरकर म्हणाले,“आंबोलीला पर्यटनदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त होत आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक स्थिरावावेत आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आंबोलीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आंबोलीचे पाच धबधब्यांचे सर्किट बनविले जाणार आहे. त्या माध्यमातून नवीन धबधबे विकसीत केले जाणार आहेत. धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांना प्रवेशशुल्क आकारण्यात येणार आहे. त्यासाठी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीकडे पर्यटन केंद्राचा विकास आणि डागडुजी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या सर्व बाबींबरोबरच धबधब्याशेजारी पार्किंग व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. पर्यटकांना अंतर्गत पर्यटनस्थळांवर जाणे शक्य व्हावे यासाठी बॅटरी ऑपरेटेड कार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर आंबोलीसह सांगेली, वेर्ले, कलंबिस्त, शिरशिंगे या घाटाखालच्या गावांचा विकास होण्यासाठी हँड ग्लायडींग, हॉट एअर बलून यासारखे साहसी खेळ सुरू करण्यात येणार आहेत. जेणेकरून या साहसी खेळांकडे आकर्षिलेले पर्यटक घाटाखालच्या गावात उतरतील आणि त्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार मिळेल हा उद्देश आहे.”
केसरकर म्हणाले,“अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या डेगवे, वाफोली आदी गावातील शेतकरी व बागायतदारांना प्रत्येक झाडामागे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या पूर्वी दर हेक्टरी भरपाई देण्यात येत होती. परंतू त्याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत होता. मात्र झाडामागे भरपाई देण्याचा पहिलाच उपक्रम राबविण्याचा विचार आहे.”

पक्षभेद विसरून विकास करू
यावेळी केसरकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पंचायत समिती सभापती रवि मडगावकर यांचे कौतुक केले. भविष्यात जिल्ह्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून काम करू असे मडगावकर यांना आवाहन केले.

Web Title: sindhudurg news amboli ghat tourism expansion hand gliding hot balloon