उद्योगमंत्री स्थानिकांना का भेटले नाहीत ? - अमोल तेली 

संतोष कुळकर्णी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

देवगड -तालुक्‍यातील गिर्ये, रामेश्‍वर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. असे असताना जिल्हा दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे येऊन स्थानिकांची का भेट घेतली नाही. यावरून प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला जनतेशी काही देणेघेणं नसल्याचे उघड असल्याची टीका स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना जनतेची दिशाभूल करीत असूून ग्रीन रिफायनरीला त्यांचा बेगडी विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री. तेली येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय बोंबडी, रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, अच्चुत बोंबडी आदी उपस्थित होते.

श्री. तेली म्हणाले, ""ग्रीन रिफायनरीवरून तालुक्‍यातील गिर्ये, रामेश्‍वर गावासह राजापूरमधील काही गावातील स्थानिकांमध्ये असंतोष आहे. असे असताना कुडाळ येथे आलेल्या उद्योगमंत्र्यांना गिर्ये, रामेश्‍वरमधील स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावीशी वाटली नाही. यावरून शिवसेनेला जनतेशी काही देणेघेण नसल्याचे दिसून येते. प्रकल्प विरोधात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक जाहीर सभा घेतात; मात्र खरंच शिवसेनेला प्रकल्प नको असता तर सत्तेत असलेली शिवसेना अध्यादेश काढून प्रकल्प रद्द करू शकली असती; परंतु जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्याशी शिवसेना आमदार, खासदारांनी या विषयावर चर्चा तरी केली काय ? उद्योगमंत्र्यांना स्थानिकांना भेटण्याची त्यांनी विनंती का केली नाही. ?''

ते म्हणाले, ""कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले; मात्र असे असताना केवळ विरोध करायचा पण प्रकल्प रद्द करण्यासाठी काही करायचे नाही. या शिवसेनेच्या भुमिकामुळे त्यांचे खरे रूप जनतेसमोर आले. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत जनताच त्यांना आता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.''

प्रकल्प रद्द करण्याची हिंमत शिवसेना का दाखवत नाही ?
उद्योगमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार शिवसेनेचे असताना ग्रीन रिफायनरीला केवळ विरोध करण्यापेक्षा प्रकल्प रद्द करण्याची हिंमत ते का दाखवत नाहीत. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी स्थानिकांची भेट का घडवून आणली गेली नाही. प्रकल्पावरून स्थानिकांची दिशाभूल करणाऱ्या शिवसेनेला जनतेशी काही देणेघेणं नाही, असेही श्री. तेली म्हणाले.

Web Title: Sindhudurg News Amol Teli Press