मोड यात्रेने भराडी देवी उत्सवाची सांगता

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 29 जानेवारी 2018

मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला.

मालवण -  महाराष्ट्राचे शक्तिपीठ आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या यात्रेचा  दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला.

दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने भाविकांनी आई भराडी चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. यावर्षी प्रथमच यात्रोत्सवात भरविलेल्या कृषी महोत्सव व सिंधू सरस प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

सायंकाळनंतर लाखोंच्या संख्येने भाविक आंगणेवाडीत दाखल झाले होते. उत्तरोत्तर भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान देवीसमोर ताटे लावण्याचा कार्यक्रमास सुरवात झाला. गावातील सुहासिनी डोक्‍यावर प्रसादाची ताटे लावून मंदिरात दाखल होत होती. रात्री ताटे लावण्याचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद मिळविण्यासाठी गावातील आंगणे कुटुंबीयांच्या घरी भाविकांची गर्दी झाली. मळ्यात उभारण्यात आलेल्या आकाश पाळणा, विविध फनीगेम्स बच्चे कंपनीसाठी पर्वणी ठरल्या.

दुसऱ्या दिवशीच्या यात्रेला मोड यात्रा म्हणून ओळखले जाते. आज सकाळीही भाविक मोठ्या संख्येने आंगणेवाडीत देवीच्या दर्शनासाठी दाखल होत होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची देवीचे दर्शन, ओट्या भरणे, नवस बोलणे, फेडणे यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. 

देवीच्या दर्शनानंतर तालुक्‍यातील शेतकरी तसेच अन्य भाविक शेतीची अवजारे तसेच अन्य गृहोपयोगी साहित्य खरेदी करून माघारी परतत होते. सायंकाळी उशिरा मंदिरात विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर यात्रोत्सवाची सांगता झाली. 
दीड दिवस चालणाऱ्या या यात्रेत सलग सुटयामुळे लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. नवस फेडून, आई भराडी तुझी आमच्यासारख्या भक्तांवर अखंड कृपा राहू दे. असे साकडे भाविकांकडून घातले. भक्तांना देवीचे सुलभरीत्या दर्शन मिळावे यासाठी नऊ रांगांचे नियोजन करण्यात आले होते. आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ मंडळ तसेच प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय झाली नाही. 

आंगणेवाडी यात्रोत्सव तसेच परिसराचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून ते स्वागत कक्षाच्या ठिकाणी लावलेल्या स्क्रिनवरून दाखविले जात होते. मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली. युवा वर्ग मंदिरावर केलेली विद्युत रोषणाईचे छायाचित्र आपल्या मोबाइलसह अन्य कॅमेऱ्यामध्ये घेत होते शिवाय सेल्फी घेण्यासाठीही भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धाही घेण्यात आली. याला क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मोफत चष्मा वाटप उपक्रमास भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

यात्रा यशस्‍वीतेसाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलिस, महसुल, आरोग्य, महावितरण, एसटी प्रशासन, आंगणे कुटुंबीय मुंबई मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे तसेच अन्य आंगणे परिवाराने परिश्रम घेतले. 

कृषी महोत्सवाचा आज शेवटचा दिवस
शासनाच्या वतीने भराडी देवीच्या यात्रेनिमित्ताने भरविलेल्या कृषी महोत्सव व सिंधू सरस याठिकाणी शेतकरी तसेच अन्य ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. विविध स्टॉल्सवर भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. २९ तारखेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री असल्याने उद्याच्या शेवटच्या दिवशीही शेतकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sindhudurg News Anagnewadi festival