आंगणेवाडीत जनसागर

आंगणेवाडीत जनसागर

मालवण - आई भराडीच्या दर्शनाची भक्ताला लागलेली आस, ‘भराडी देवी नमो नमः’चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी आज भराडी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. भराडी देवीच्या दर्शनाने भाविक कृतार्थ झाले. भराडी मातेच्या जयघोषाने संपूर्ण आंगणेवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

(व्हिडिआे - कृष्णकांत साळगांवकर)

मध्यरात्री तीनपासून देवीचे दर्शन आणि ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. दिवसभरात शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकारी, चित्रपट कलावंतांनी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या आंगणेवाडीतील आई भराडीच्या यात्रेसाठी गेले महिनाभर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने तसेच प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. यावर्षी प्रथमच आंगणेवाडीत कृषी महोत्सव तसेच सिंधू सरस प्रदर्शन भरविण्यात आल्याने कालपासूनच भाविक आंगणेवाडीत दाखल होत होते. मध्यरात्री तीनपासून देवीच्या ओटी तसेच नवस बोलणे, फेडणेच्या कार्यक्रमास सुरुवात होणार असल्याने राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. रेल्वे, एसटी बसेस तसेच खासगी वाहनांमधून भाविक दुपारपासून आंगणेवाडीत दाखल होत होते. देवीच्या दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या पुलांवर भाविकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र मध्यरात्री पाहावयास मिळाले.

यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. भाविकांना देवीचे दर्शन उत्तम व्हावे, यासाठी सात रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अपंग तसेच अतिमहनीय व्यक्‍तींसाठी स्वतंत्र रांग होती. त्यामुळे भाविकांना देवीचे तत्काळ दर्शन घेता येत होते. 

पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ज्यांना केवळ देवीचे मुखदर्शन घ्यायचे होते, अशा भाविकांसाठी आवश्‍यक सुविधा ग्रामस्थ मंडळाने उपलब्ध करून दिली होती. या सुविधेचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. सकाळच्या सत्रातही भाविकांची मोठी गर्दी झाली. देवीच्या दर्शनानंतर कृषी प्रदर्शन तसेच गृहोपयोगी साहित्याची खरेदी करण्यावर भाविकांचा भर असल्याचे दिसून येत होते. 

सकाळच्या सत्रात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, नीलम राणे, आमदार नीतेश राणे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रवींद्र फाटक, खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश पारकर, माजी आमदार शिवराम दळवी, देवदत्त सामंत, अशोक सावंत, दीपक पाटकर, संतोष आचरेकर, सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, मंदार केणी, यतीन खोत, किरण पावसकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, चित्रपट कलावंत अरुण कदम यांच्यासह अन्य विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देवीचे दर्शन घेतले. मुंबई, ठाणे, वसई महापालिकेतील नगरसेवकांनीही भराडी मातेचे दर्शन घेतले. नवस बोलणे, फेडणे तसेच तुलाभार करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. 

यात्रेत कृषी प्रदर्शन तसेच सिंधू सरस महिला बचत गटांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच मालवण तसेच कणकवलीच्या दिशेने जिल्ह्यातील हॉटेल्स व्यावसायिक, मिठाई, अन्य गृहोपयोगी साहित्य, आकाश पाळणे, लहान मुलांना आकर्षून घेणारे विविध खेळ उभारण्यात आले होते. जिल्हा बॅंक, विविध राजकीय पक्षांचे स्वागत कक्ष, भाजपचे मोफत चष्मा वाटप उपक्रम, अरुण दुधवडकर यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या साईबाबांवर आधारित हालता देखावा भाविकांचे खास आकर्षण ठरला होता. 

दुपारनंतर आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. भाविकांसाठी एसटी प्रशासनाच्या वतीने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मालवणवरून जाण्यासाठी एस. टी. बसस्थानक, टोपीवाला हायस्कूल, तारकर्ली, देवबाग, आनंदव्हाळ, सर्जेकोट, मालोंड, मसुरे येथून एसटी गाड्या सोडण्यात येत होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध आगारांमधून बसेसची सुविधा करण्यात आली होती. एसटी गाड्यांबरोबरच लक्‍झरी, खासगी सहाआसनी, तीनआसनी तसेच अन्य खासगी वाहनांमधून भाविक यात्रेत दाखल होत होते. आंगणेवाडीत खासगी वाहनांसाठी तीन किलोमीटरवर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची पथके कार्यरत ठेवण्यात आली होती. यात्रेसाठी मुंबईकर चाकरमानी आजही सकाळच्या सत्रात शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागात दाखल होताना दिसत होते. यात्रेनिमित्ताने आरोग्य, महसूल यंत्रणा, पोलिस तसेच अन्य शासनाच्या विभागाचे कक्ष उभारले होते. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सलग सुट्या आल्याने चाकरमान्यांबरोबर पर्यटकही मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने शहरातील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र होते. वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली असतानाही सातत्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत होती. आंगणेवाडीत देवीचे दर्शन माघारी परतलेले भाविक शहरातील विविध पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत होते. त्यामुळे शहरासह, तारकर्ली, देवबाग, चिवला बीच येथील किनारपट्टी बहरून गेल्याचे चित्र होते. चाकरमानी, भाविक तसेच पर्यटकांमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक, मिठाई तसेच अन्य व्यावसायिकांची चांगली आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले. देवीच्या दर्शनानंतर भाविक कृतार्थ होऊन माघारी परतताना दिसत होते.

राज्याच्या कल्याणाचे भराडी देवीला साकडे
राज्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्यांना सुख मिळू दे, शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू दे, असे साकडे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आई भराडीस घातले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या चांगल्या नियोजनामुळे भाविकांना सुलभरीत्या दर्शन घेता येत आहे. विकासाच्या बाजूने काम आमच्या हातून होऊ दे, असे गाऱ्हाणे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घातले. 
महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट दूर कर. महाराष्ट्र हे विकसनशील राज्य होऊ दे, असे साकडे महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भराडी मातेकडे घातले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com