वन्यप्राण्यांकडून पशुधनावर हल्ल्याच्या घटनात वाढ

भूषण आरोसकर
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

गतवर्षी ९८ तर यंदा जानेवारीपर्यंतच हल्ल्याची ११९ प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून जिल्ह्यातील पशुधन संकटात असल्याची बाब ठळक आहे.

सावंतवाडी - जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून मानवावर होणाऱ्या हल्ल्यातील प्रकरणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे; मात्र पशुधनावर वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी ९८ तर यंदा जानेवारीपर्यंतच हल्ल्याची ११९ प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून जिल्ह्यातील पशुधन संकटात असल्याची बाब ठळक आहे.

जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून पीक नुकसानीचे प्रकार हे वारंवार होतच असतात. त्यातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. डोंगर पायथ्यावरून खाली येत वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीत हैदास घातला जातो. यात जोडधंदा म्हणून पशुपालनाचा आधार शेतकऱ्यांचा असतो. शिवाय शेती कामासाठी मोठी मदतही होत असते. अशात पशुधनावर होणाऱ्या हल्ल्यात मोठी वाढ झाली असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर शेतीच्या माध्यमातून आर्थिक़ उत्पन्न वाढविणे कठीण बनले आहे. 

चार वर्षांपूर्वी दोडामार्गमार्गे जिल्ह्यातील इतर भागांत पाऊल ठेवलेल्या हत्तींनी नुकसानीने बरीच ठिकाणी प्रभावित केली होती; मात्र हत्तीचा अपवाद वगळता इतर वन्यप्राणीही नुकसानीसोबत हल्ले करण्यात बरेच पुढे आले 
आहेत.

यात नुकसानीने प्रभावित होणाऱ्या मानवाची उदासिनता ठळक असल्यामुळे शेतीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे; मात्र पशुधनावरही होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. अलिकडे याचे प्रमाण अधिक झाले आहेत. गतवर्षी ९८ वेळा वन्यप्राण्यांकडून पशुधनावर हल्ले झाले आहेत. यावेळी ९ लाख ११ हजार २३० एवढी भरपाई देण्यात आली. तर यावर्षी फक्त जानेवारीपर्यंतच याहीपेक्षा म्हणजेच ११२ वेळा पशुधनाला मृत व जखमी होण्याची वेळ आली आहे. तर यासाठी १३ लाख ९५ हजार १०० एवढी नुकसानी देण्यात आली आहे. वन्यप्राण्यापासून मात्र पशुधन संकटात आहे ही बाब ठळक दिसुन येत आहे.

वन्यप्राण्यांकडून मानवावर होणाऱ्या हल्ल्यात घट झाल्याचे समोर येत आहे. शेतीबाबत उदासिन व वन्यप्राण्यांकडून वारंवार नुकसानी होत असल्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांकडून शेतीकडे पाठ फिरविण्यात येत आहे. शिवाय ज्या ठिकाणच्या शेतीमध्ये वन्यप्राण्याचा वावर ठळक असतो अशा ठिकाणच्या बऱ्याच शेती पडीक होत आहेत. वन्यप्राण्यांकडून जीव गमाविण्यापेक्षा शेतीकडे पाठ फिरविण्याची नामुष्की आज आली असल्याचे दिसून येत आहे.

मानवी प्राण्यावर होणाऱ्या हल्यात व पशुधनावर होणारे हल्ले हा एक निसर्गाचाच भाग आहे. वन्यप्राण्यापासून होणाऱ्या हल्ले कमी होण्यासाठी मानवाने स्वतःची व पशुधनाची काळजी स्वतः घेतली पाहिजे. तरच यात घट होवू शकते.
- समाधान चव्हाण,
उपवनसंरक्षक

पशुधन हानी

  • वर्ष     प्रकरण      रक्कम
  • २०१४ -१५        १४२      १० लाख ९५ हजार ४९८
  • २०१५-१६      १२८      ९१ हजार ३०१ 
  • २०१६-१७      ९८      ९ लाख १२ हजार २३०
  • २०१७-१८(जाने)       १२९      १३ लाख ९५ हजार १००

एकूण    ४८७     ४ कोटी ३१ लाख ५५ हजार २९ रुपये
मनुष्यहानी

  • २०१४-१५      ६      २ कोटी
  • २०१५-१६      ९     ५५ लाख ७ हजार ६
  • २०१६-१७      ५      ६१ लाख ८६ हजार ७७
  • २०१६-१७ (जाने)      १      ७ हजार १८४
  • एकूण ः            २१      ३५ लाख ८२ हजार ८६७
Web Title: Sindhudurg News attack on wild animals on domestic animals