कालव्याला इंचभरही जमीन देणार नाही - अतुल रावराणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

वैभववाडी - गळती लागलेल्या कालव्यांची दुरुस्ती आणि यापूर्वी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देवधर धरण प्रकल्पग्रस्तांना मिळेपर्यंत उर्वरित कालव्यासाठी एक इंचही जमीन दिली जाणार नाही, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी  भूसंपादन अधिकाऱ्यांना दिला.

वैभववाडी - गळती लागलेल्या कालव्यांची दुरुस्ती आणि यापूर्वी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देवधर धरण प्रकल्पग्रस्तांना मिळेपर्यंत उर्वरित कालव्यासाठी एक इंचही जमीन दिली जाणार नाही, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी  भूसंपादन अधिकाऱ्यांना दिला.

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील उर्वरित पोटकालव्यांसाठी लागणारी जमीन संपादित करण्याच्या पार्श्‍वभूमीवर आचिर्णे येथील रासाई मंदिरात शेतकऱ्यांची सभा झाली. या सभेला जिल्हा भूसंपादन अधिकारी डॉ. दीपा भोसले, मंडल अधिकारी आय. आर. तडवी, स्थापत्य अधिकारी राजेश शिवापूरकर, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. के. शेंडगे, तलाठी एस. डी. दाभोळकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

देवधर मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काही प्रमाणात पूर्ण झाले आहे. उर्वरित कालवा आणि पोटकालव्याकरिता जमिनीची आवश्‍यकता आहे. त्या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी डॉ. भोसले यांनी शेतकऱ्यांना कालव्याची कामे मार्गी लागण्यासाठी जमीन संपादित करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. या वेळी ग्रामस्थांनी जमीन भूसंपादन करण्यास तीव्र शब्दात विरोध केला. 

ग्रामस्थांच्या वतीने भाजप नेते रावराणे यांनी आक्रमक भूमिका मांडली. यापूर्वी उजव्या कालव्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले; परंतु या कालव्यांकरिता भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला जमीन मालकांना अद्याप मिळालेला नाही. 

हा मोबदला केव्हा देणार? कालव्याचे काम देखील निकृष्ट झाले असून यामधून होत असलेल्या गळतीमुळे आचिर्णे व लोरे येथील दोनशे एकर शेती नापीक झाली आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कोण देणार, असा जाब रावराणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

यावेळी भुसंपादन अधिकारी डॉ. भोसले यांनी यापुर्वी भुसंपादन केलेल्या जमीन मालकांच्या रक्कम उपलब्ध झाली असुन येत्या महिनाभरात ही रक्कम जमीनमालकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यानंतर रावराणे यांनी कालव्यांची दुरूस्ती तत्काळ करा. जोपर्यत कालव्यांतुन गळती सुरू आहे तोपर्यंत कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान सुरूच राहणार आहे. या दोन प्रमुख समस्या मार्गी लागत नाही तोपर्यत उर्वरित मुख्य कालवा आणि पोटकालव्यांकरीता एक इंचही जमीन भुसंपादीत करू दिली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

यावेळी पाटबंधारे विभागाचे शेंडगे यांनी कालव्यांच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले आहे. ते मंजुर होताच काम तातडीने करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जमीनमालकांनी वारस तपास, भुसंपादन मिळणाऱ्या नोटीस याबाबत हरकती नोंदविल्या. संदीप विचारे यांनी वारस नोंदी होत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत असल्यांची खंत त्यांनी व्यक्त केली. या सभेला महेंद्र रावराणे, रूपेश रावराणे, सुनील डोंगरे, महेश विचारे, हेमंत रावराणे, रामचंद्र बापार्डेकर, सिताराम डोंगरे, युवराज रावराणे, रवी मांडवकर आदी उपस्थित होते.

महिन्यात मोबदल्याची ग्वाही...
यावेळी भूसंपादन अधिकारी डॉ. भोसले यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यानेच भूसंपादन केले जाणार आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार तीन महिन्यात जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करता येतात. त्याचा मोबदला देखील जमीनमालकांना तत्काळ मिळतो. तशाच पद्धतीने पुढील कालव्यांसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. याशिवाय यापूर्वी संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा जमिनीचा मोबदला एक महिन्यात मिळणार आहे; मात्र शेतकऱ्यांनी सहहिस्सेदारांचे संमतीपत्र देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg News Atul Ravrane comment