सिंधुदुर्गात पावसाने गाठली गतवर्षीची सरासरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून गतवर्षीची सरासरी गाठली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी २५१०.३० मिलिमीटर पाऊस तर यावर्षी आतापर्यंत एकूण सरासरी २५२२.९१ मिलिमीटर पाऊस झाला.

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून गतवर्षीची सरासरी गाठली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी २५१०.३० मिलिमीटर पाऊस तर यावर्षी आतापर्यंत एकूण सरासरी २५२२.९१ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात गणेशोत्सवापासून पावसाचा जोर वाढला असून सुरुवातीपासून धिम्या गतीने सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. गेले आठ दिवस पडणाऱ्या पावसाने गतवर्षीची सरासरी गाठली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचे कणकवली आणि सावंतवाडी तालुक्‍यात अधिक प्रमाण असून कणकवली तालुक्‍यात एकूण सरासरी ३१३८ मिलिमीटर तर सावंतवाडी तालुक्‍यात ३१०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवापूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा जोर धरत त्रेधा उडविली. यावर्षी गणेशोत्सव पावसाच्या धुवाँधार आगमनात संपला तर त्यानंतर गेले चार दिवस सकाळच्या सत्रात कडक ऊन आणि सायंकाळच्या सत्रात धुवाँधार पाऊस अशा स्थितीत प्रचंड विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात पाऊस पडत आहे.

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भातशेती चांगली फुलोऱ्यावर आली आहे. भातकापणीचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसाचे प्रमाण यापुढे अधिक वाढल्यास कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; मात्र हवामान खात्याकडून ऑक्‍टोबरअखेरपर्यंत अधून मधून पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या २४ तासात पावसाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्‍यताही व्यक्त केली आहे.

असा बरसला पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत दोडामार्ग- २७२५, सावंतवाडी-३१००.३, वेंगुर्ले- २२०८.९, कुडाळ- २३३३.७, मालवण-१८८४.४, कणकवली- ३१३८, देवगड- १९७३, वैभववाडी-२८२० मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. आतापर्यंत खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून सुमारे ६७ लाखांचे नुकसान झाले.

 

Web Title: sindhudurg news average rains in sindhudurg