खोटं धर्मशास्त्र, राजकारण्यांची चिरफाड गरजेची - प्रवीण बांदेकर

खोटं धर्मशास्त्र, राजकारण्यांची चिरफाड गरजेची - प्रवीण बांदेकर

वेंगुर्ले - आता धर्ममार्तंड आणि राजकारणी हातात हात घालून नवी खेळी खेळत आहेत. अशाच काळात खोटं धर्मशास्त्र आणि अशा राजकारणी यांच्या संधिसाधू नात्याची चिरफाड करणे गरजेचे आहे. नागपूर येथील कवी डॉ. मच्छींद्र चोरमारे यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या ‘अमानुष नोंदी’ या काव्यसंग्रहातून धर्माच्या नावाने खोटा इतिहास लिहिणाऱ्यांचा चेहरा उघड केला आहे. त्यामुळेच येथील विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशनने डॉ. चोरमारे यांच्या ‘धर्मशास्त्राच्या अमानुष नोंदी’ काव्यसंग्रहाला सावित्रीबाई फुले काव्यपुरस्कार देऊन डॉ. चोरमारे यांचा यथोचित गौरव केल्याचे प्रतिपादन कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांनी येथे केले.

येथील नगरवाचनालय सभागृहात विनोदीनी आत्माराम जाधव फाऊंडेशन आयोजित क्रांतिज्योती राज्यस्तरीय काव्यपुरस्कार वितरण सोहळा श्री. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी कवी अजय कांडर यांच्या हस्ते डॉ. चोरमारे यांना सावित्रीबाई फुले काव्यपुरस्काराने गौरविण्यात आले. व्यासपिठावर कवी सुनील हेतकर, वीरधवल परब, कथालेखिका वृंदा कांबळी, कवी अरुण नाईक, मधुकर मातोंडकर, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, विठ्ठल कदम, का.हु.शेख, कैवल्य पवार, कल्पना बांदेकर, किशोर कदम, कार्यक्रमाचे संयोजक अनिल जाधव, सुनिल जाधव आदी उपस्थित होते.

श्री. कांडर म्हणाले, ‘‘डॉ. चोरमारे या गुणवान कविंचा गौरव करुन जाधव फाऊंडेशनने सिंधुदुर्गाची सांस्कृतिक चळवळ नागपूरपर्यंत पोहचविली आहे.’’
पुरस्कार वितरणानंतर कवी सिद्धार्थ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या. कवी संमेलनात विद्राही विचारांचा आवाज घुमला. या कवी संमेलनात डॉ. चोरमारे, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम, मनिषा जाधव, किशोर कदम, बाळकृष्ण जाधव, दीपक तळवडेकर, कल्पना बांदेकर, मनोहर परब, श्‍वेतल परब, शालिनी मोहळ, संजय घाडी, पी.के.कुबल, राजेश वराडकर आदींनी कविता सादर केल्या. प्रास्ताविक सुनिल जाधव यांनी, सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार अनिल जाधव यांनी मानले.

इतिहास तपासून बघायला हवा...
डॉ. चोरमारे म्हणाले, ‘‘नागपूरसारख्या दूरवरच्या भागातील कवीचा गोव्याच्या सीमेवर असणाऱ्या तळकोकणातील वेंगुर्लेसारख्या भागातून गौरव करण्यात येतो. ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारी आहे. बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धांची करुणा घेऊन मी लेखन करतो. पण आपला इतिहास आपण तपासून बघायला हवा. असे पाहिले तरच धर्मशास्त्रातील अमानुष नोंदी आपल्याला सापडत जातात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com