बांदकरवाडी अंडरपास ठरणार ग्रामीण भागाला वरदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कणकवली - शहरातील बांदकरवाडी येथे रेल्वे मार्गाखालून अंडरपास तथा भुयारी मार्ग होणार आहे. याचे भूमिपूजन नुकतेच खासदार विनायक राऊत यांनी केले. मे अखेरपर्यंत हा मार्ग पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर रखडलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्‍यता आहे.

कणकवली - शहरातील बांदकरवाडी येथे रेल्वे मार्गाखालून अंडरपास तथा भुयारी मार्ग होणार आहे. याचे भूमिपूजन नुकतेच खासदार विनायक राऊत यांनी केले. मे अखेरपर्यंत हा मार्ग पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर रखडलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अंडरपास होत असताना त्याला जोडणारा पर्यायी मार्गदेखील तयार केला जावा, अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे काम सुरू होत असताना जुना नरडवे रस्ता बांदकरवाडी येथे बंद झाला. त्याऐवजी परबवाडीतून नवीन नरडवे रस्त्याला जोडणारा मार्ग तयार करण्यात आला. यात बांदकरवाडीचा भाग दुभंगला गेला. याखेरीज बांदकरवाडी, वरचीवाडी, धनगरवाडी, पिळणकरवाडी, मधलीवाडी या भागातील नागरिकांना जा-ये करण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा पडू लागला. एवढी पायपीट करण्यापेक्षा रेल्वेमार्ग ओलांडून नागरिकांनी पसंत केले. 

मात्र, गेल्या पंधरा वर्षांत कोकण रेल्वेमार्गावर गाड्यांची संख्या वाढली. याखेरीज रेल्वे स्थानक ते बांदकरवाडी परिसरापर्यंत दोन लूप लाईन वाढविण्यात आल्या. यामुळे हा मार्ग ओलांडणे आणखीनच धोकादायक झाले. त्यामुळे  रेल्वे मार्गाखालून अंडरपास केला जावा, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला. 

खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने बांदकरवाडी येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी मिळाली. नुकतेच या कामाचे उद्‌घाटन झाले. सध्या बांदकरवाडी रेल्वे मार्गालगत अंडरपास कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या काँक्रिट खांब तयार केले जात आहेत. सुमारे दीड महिन्यात भुयारी मार्गासाठीचे खांब तयार केले जाणार आहेत. तर मे अखेरपर्यंत ३ तासांचा मेगाब्लॉक घेऊन भुयारी मार्ग खोदला जाणार आहे. 

या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने २६ लाख रुपये मंजूर केले आहे. अंडरपासचे काम पूर्ण झाल्यानंतर दुभंगलेली बांदकरवाडी जोडण्यास मदत होणार आहे. याखेरीज रेल्वे अंडरपास, बांदकरवाडी ते वरचीवाडीपर्यंत नवीन मार्ग तयार झाला तर येथील ग्रामीण भागाच्याही विकासाला चालना मिळणार आहे. नवा मार्ग तयार झाल्यानंतर शाळा, हायस्कूलसह महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही रेल्वे मार्ग ओलांडण्याचा धोका टाळता येणार आहे.

२६ लाखांचा खर्च...
बांदकरवाडी रेल्वे अंडरपाससाठी २६ लाख रुपये कोकण रेल्वे प्रशासनाने मंजूर केले आहे. अडीच मीटर उंच आणि दोन मीटर रुंद असलेल्या या बोगद्यामधून छोट्या वाहनांना जा-ये करता येणार आहे. तीन तासांचा मेगाब्लॉक मिळाल्यानंतर दोन मीटरचा रेल्वे ट्रॅक तोडून भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. त्यानंतर तोडलेले रूळ पुन्हा सांधले जाणार आहेत.

Web Title: Sindhudurg News Bandkarwadi underpass issue