मालवणात भोंदूबाबा ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

मालवण - जादूटोणा करण्यासाठी तालुक्‍यातील सात जणांचे सुमारे २ लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी तुकाराम बाळकृष्ण मेस्त्री ऊर्फ मंगेश पांचाळ (वय ५०, रा. रेवतळे फाटक शाळा) याला आज दुपारी येथील पोलिसांनी रेवतळे येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक, तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

मालवण - जादूटोणा करण्यासाठी तालुक्‍यातील सात जणांचे सुमारे २ लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी तुकाराम बाळकृष्ण मेस्त्री ऊर्फ मंगेश पांचाळ (वय ५०, रा. रेवतळे फाटक शाळा) याला आज दुपारी येथील पोलिसांनी रेवतळे येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक, तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबतची तक्रार कृष्णा वासुदेव चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.
कृष्णा चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नीच्या मृत्यूनंतर चार ते पाच दिवसांनी माझा मुलगा नरेश याला भेटण्यासाठी तुकाराम मेस्त्री ऊर्फ मंगेश पांचाळ आला होता.

याचदरम्यान विवाहित मुलगी ममता हिच्या पतीस बरे नसल्याची सर्वांना चिंता असल्याचे तुकाराम याला कळले. यावर त्याने तुमच्या जावयाच्या हाताखालील माणसांनी जादूटोणा केल्याने त्याला बाधीकार झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचारासाठी ४५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगून दोन टप्प्यांत पैसे घेतले. यानंतर नरेशकडून व्यवसायात यश मिळवून देण्यासाठी १९ हजार रुपये, सून निकिता हिच्याकडून ३० हजार रुपये उकळले. त्याने पांढऱ्या कापडात काही वस्तू दिल्या. 

त्या दुकानात बांधून ठेवल्या आहेत. फेब्रुवारीत मेस्त्रीने काही साथीदारांसह मुलाला कसवण कणकवली येथील एका स्मशानभूमीत नेत रात्री साडेबारा वाजता कोंबडा-कोंबडी याचा बळी दिला. अन्य पूजा विधी केले. जावयाची प्रकृती ठीक करण्यासाठी त्याने दोन वेळा जादूटोणा केला, असे चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

येथील पोस्ट कार्यालयाजवळ राहणाऱ्या सौ. आरोही चंद्रकांत साळवी (वय २१) यांच्याकडून कौटुंबिक कलह दूर करण्याबरोबर जादूटोणा विधीसाठी ४५ हजार रुपये, सौ. वैशाली विजय गिरकर (५० रा. सर्जेकोट ता. मालवण) यांच्याकडून व्यापारात यश मिळवून देण्यासाठी ९१ हजार रुपये, दीपक बाळकृष्ण वराडकर (२८, रा. वायरी आडवण) यांच्याकडून आठ हजार रुपये तुकाराम मेस्त्री याने उकळले. 

घरातूनच घेतले ताब्यात
मेस्त्री काही दिवस पसार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. तो, आज दुपारी घरी आल्याची माहिती मिळताच प्रभारी पोलिस अधिकारी अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेश्‍मा मोमीन, नीलेश सोनावणे, संतोष गलोले, संतोष नाटेकर यांच्या पथकाने त्याला रेवतळे येथून ताब्यात घेतले. येथील पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sindhudurg News Bhondubaba arrested in Malvan