माणुसकीचा साक्षात्कार होईना

माणुसकीचा साक्षात्कार होईना

जीडीपी वाढीच्या गप्पा मारणाऱ्या सिंधुदुर्गात एखादी वस्ती स्वतःचे अस्तित्वच सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याची कोणीच दखल घेत नाही. केसरी-आलाटी धनगरवाडीबाबत हे वास्तव आहे. आपण खऱ्या अर्थाने ‘माणसात’ येऊ या आशेने या वस्तीने नानापाणी येथील आपली घरेदारे सोडून केसरीत नवा संसार मांडला; पण त्यांची स्थिती आगीतून फोपाट्यात पडल्यासारखी झाली आहे. माणसांमध्ये येऊनही त्यांना अद्यापही माणुसकीचा साक्षात्कार झालेला नाही. प्रशासन त्यांचे अस्तित्वच मानायला तयार नाही. येथील ग्रामस्थांच्या डोळ्यांतील अश्रूही आता आटले आहेत.

नानापाणी हे आंबोलीच्या डोंगरात टोकावर वसलेले ठिकाण. धनगर समाजातील १८ कुटुंब येथे राहत होती. ‘माणसा’सारखं जगता येईल, अशी कोणतीच व्यवस्था तेथे नव्हती. शासनाने त्यांना भूमिहीन योजनेतून १९९५ मध्ये घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केसरी आलाटी येथे प्रत्येकी ९५ गुंठे जागा दिली, पण ही कुटुंबे ‘माणसात’ यायला कचरतच राहिली. काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना या जमिनीत राहण्यास येण्याचा आग्रह धरला. आम्ही शिकलो नाही; पण पुढची पिढी तरी शिक्षण प्रवाहात यावी या विचाराने या समाजातील तरुणांनी स्थलांतराचा विचार पक्‍का केला. शिक्षणाबरोबर रस्ता, वीज, पाणी मिळेल अशी आशा होती.

२०१२ ला त्यातील काहींनी केसरीतील आपल्या जागेत खोपटी उभारली. २०१३ मध्ये पक्‍की घरे बांधायला घेतली. त्यांना मिळालेली जागा ओसाड माळावरचीच होती. प्रारंभी लोकप्रतिनिधींनी मदत केली. २०१३ ला पाच तर त्यांच्या पुढील वर्षी दोन घरे घरकुल योजनेतून मंजूर झाली. इतरांनी स्वतः घरे उभारली. एकूण १५ घरे आणि जवळपास ८० ते १०० लोकवस्ती येथे स्थिरावली. पाऊण किलोमीटरवरील शाळेत पायपीट करून जाऊन मुले श्री गणेशा गिरवू लागली. सध्या येथील २४ मुले शाळेत जातात. पक्‍की घरे आणि हक्‍काची जमीन मिळाली; मात्र त्यानंतर दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले.

नानापाणीतून नव्या जागेत येण्यास प्रोत्साहन देणारेच त्यांना आतून विरोध करू लागले. त्यांच्या घरांची अधिकृत नोंद प्रशासनाच्या दप्तरी करण्यास टाळाटाळ सुरू झाली. घरकुल योजनेतून बांधून दिलेल्या घरांनाही नंबर द्यायला नकार मिळाला. या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आवाज पोचवायचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. वस्तीपर्यंत पोचायला धड रस्ताही नाही. वीज हा तर खूप दूरचा विषय. पाण्याची स्थिती त्याहून वाईट. वस्तीपासून साधारण पाऊण किलोमीटरवरील ओहळातून पाणी आणावे लागते. हा रस्ता नव्हे तर उभा कडा आहे. दिवसभरात महिला, पुरुष, मुलांना पाणी आणण्यासाठी तासन्‌तास घाम गाळावा लागतो. वन्य श्‍वापदांची भीती आहेच. एखादा आजारी पडला तर जवळपास वैद्यकिय सेवा नाही. त्यामुळे माणसांच्या जवळ येऊन आपण चूक केली की काय असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा ठाकलाय.

आम्ही जायचे कुठे?
सुविधा सोडाच किमान आमच्या घरांना नंबर देऊन आम्ही माणसे आहोत हे मान्य करा, अशी आर्त हाक हे ग्रामस्थ देत आहेत; पण त्यांचे दुःख मतांच्या संख्येवर प्रश्‍नाची तीव्रता समजून घेणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या गावीही नाही. या माळावर उत्पन्नाचे साधन नसल्याने बरीच पुरुष मंडळी पोट भरण्यासाठी पुण्या-मुंबईतील हॉटेलात राबतात. बायका मोलमजुरी करतात. वस्तीत उरतात म्हातारी माणसे आणि मुले. त्यांच्या डोळ्यांत हतबलतेशिवाय काहीच दिसत नाही.

नानापाणीच्या नावातच पाणी आहे प्रत्यक्षात नाही पाणी, वीज, रस्ते मिळतील म्हणून घरदार सोडून इथे आलो; पण आमचे नशीब काही बदलेना. माझे आयुष्य आता संपत आले. आमच्या नातवंडांना तरी सोयी-सुविधा मिळाव्यात.
-श्रीमती नकली जंगले, रहिवासी

नानापाणीच्या नावातच पाणी आहे प्रत्यक्षात नाही पाणी, वीज, रस्ते मिळतील म्हणून घरदार सोडून इथे आलो; पण आमचे नशीब काही बदलेना. माझे आयुष्य आता संपत आले. आमच्या नातवंडांना तरी सोयी-सुविधा मिळाव्यात.
-श्रीमती नकली जंगले, रहिवासी

संबंधित घरांना घरनंबर का मिळाले नाहीत, याची सविस्तर फाईल बघायची आहे; मात्र माझ्या माहितीनुसार त्या जमिनीविषयी गुंतागुंत आहे. ते मूळ रहिवासी देवसू ग्रा.पं. च्या कार्यक्षेत्रातील होते. नंतर त्यांनी केसरी ग्रा.पं. कार्यक्षेत्रात घरे बांधली. त्यांना घरकुलमधून कोणत्या ग्रा.पं.तर्फे घरे मंजूर झाली हे पाहायला हवे. खनिज कंपनीशी केलेल्या कराराबाबतही काही महसुली गुंतागुंत असल्याची शक्‍यता आहे.
-देवेंद्र सावंत, सरपंच केसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com