पर्यटनातील मास्टरस्ट्रोक....पाणबुडीच्या माध्यमातून सागरी सफर

शिवप्रसाद देसाई
सोमवार, 12 मार्च 2018

वेंगुर्ले तालुक्‍यातील निवती रॉक या समुद्रातील बेटाच्या परिसरात दडलेले अद्‌भुत सागरी विश्‍व पर्यटकांना पाहता यावे यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पाची तरतूद केली आहे. बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना हे विश्‍व न्याहाळता येणार आहे. भारतातील अशा पद्धतीचा हा पहिला पर्यटन प्रकल्प म्हणजे सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अनेक अर्थाने मारलेला हा मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल. हा प्रकल्प येत्या आठ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसे प्रत्यक्षात झाल्यास वेंगुर्ले अंडरवॉटर टुरिझममधील जागतिक दर्जाचा पॉईंट बनणार आहे. जाणून घेऊया प्रकल्पाच्या अंतरंगाविषयी...

सिंधुदुर्गचे सागरी विश्‍व
सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्‍व जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मीळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे तर अनवटच जैवविश्‍व आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील सर्व समुद्रकिनाऱ्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. यात सिंधुदुर्गातील समुद्रात दुर्मीळ अशी मत्स्यसंपत्ती असल्याचे लक्षात आले. जगात काही मोजक्‍याच ठिकाणी आढळणारे समुद्रीवड, समुद्रीगवत सिंधुदुर्गातील समुद्राच्या पोटात अनेक ठिकाणी आहे. सिंधुदुर्गातील किनारा भागात आतापर्यंत गोळा केलेल्या सर्वेक्षणावरून असे आढळले आहे की, सागरी प्राण्यांचे १९८ प्रकार या भागात आढळले. त्यात स्पंज, समुद्री फूल, समुद्री पंखा, प्रवाळ, विविध प्रकारचे मासे, खेकडे, कासव, जिवंत शेवाळ यांचा समावेश आहे. 

निवती रॉक आहे तरी काय?
सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पॉट आहेत. यात निवती रॉक सर्वाधिक आकर्षण ठरेल असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोहोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची दोन ते तीन बेटे आहेत. पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारले होते. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशामध्ये राहील. कालांतराने त्सुनामीमुळे हे दीपगृह उद्‌ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे. तेथे काही वर्षापूर्वी स्वीफ्ट पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जेवढा गूढ आणि सुंदर दिसतो, त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर तेथील समुद्रविश्‍व आहे.

निवती रॉकचे अंतरंग
निवती रॉक परिसरात वर दिसणारे खडक म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या खालचा भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोहोचताच तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत.

पाणबुडीच का?
बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी पर्यटनासाठी वापरण्याचा भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. अमेरिका, बाली, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये असे प्रयोग झाले आहेत. आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये पाणबुडी पर्यटनासाठी वापरल्याचे सांगितले जाते; पण ती पाणबुडी नसून बोटच म्हणावी लागेल; कारण ती समुद्राच्या पृष्ठभागावरच तरंगते. स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या आत जाता येऊ शकते; मात्र स्कूबा डायव्हिंगवर पर्यटकाच्या क्षमता प्रभाव टाकतात. स्कूबच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार १२ वर्षाखालील मुलांना याचा वापर करता येत नाही. वृद्ध, उच्चदाबाचे रुग्ण, महिला याही स्कूबाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. याऐवजी पारदर्शक पाणबुडीमधून सर्व वयोगटातील पर्यटकांना समुद्राच्या पोटात जाऊन हे विश्‍व अनुभवता येणार आहे. 

दृष्टिक्षेपात

 •       पाणबुडी प्रकल्पात वेंगुर्ले ते निवती रॉकपर्यंतचे क्षेत्र विकास टप्प्यात

 •       प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च 

 • ४९ कोटी

 •       बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची पर्यटक क्षमता ३०

 •       प्रकल्पासाठी आवश्‍यक गोष्टी - मदरशिप, पाणबुडी, पॅसेंजर ट्रान्स्फर बोट, धक्का

 •       प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा कालावधी - ८ ते ९ महिने

 •       निवती रॉक परिसरातील सागरी विश्‍व - विविध प्रकारचे रंगीत मासे, दुर्मीळ, वैशिष्ट्यपूर्ण सागरी वनस्पती, समुद्राच्या आतील गुहा, देखणा खडकाळ भाग

कसा मिळणार आनंद?
पाणबुडी पर्यटनाची सुरुवात वेंगुर्लेतून होणार आहे. येथून पर्यटकांना एक सुसज्ज आधुनिक बोट निवती रॉकच्या दिशेने घेऊन जाणार आहे. हे अंतर ३० ते ४० मिनिटांचे असून या प्रवासात डॉल्फीन दर्शन, सागरी सफर आणि समुद्रातील देखणे नजारे अनुभवता येणार आहेत. निवती रॉकजवळ पोचल्यावर तेथे वेटिंग पिरियड असणार आहे. या काळात त्या भागातील दीपगृह व परिसर न्याहाळता येईल. ३० पर्यटक क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी समुद्राच्या खाली असेल. ती साधारण पाणबुडीच्या आकाराची बससारखी असेल. त्याच्या बाजूला मदरशिप असेल. येथून सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक खबरदारी घेण्याबरोबरच चार्जिंग व इतर व्यवस्था पुरवली जाईल. पॅसेंजर ट्रान्स्फर बोट पर्यटकांना या पाणबुडीपर्यंत घेऊन येईल. यानंतर पाणबुडी समुद्राच्या पोटातील जैवविविधता दिसेल अशा पद्धतीने फिरणार आहे. याचवेळी स्कूबा डायव्हिंग करणारे सहकारी माशांना या पाणबुडीच्या परिसरात खाद्य टाकतील. त्यामुळे आतील वैशिष्ट्यपूर्ण मासे पर्यटकांना जवळून न्याहाळता येतील. शिवाय आतील प्रवाळे, शैवाल व इतर वनस्पती जवळून पाहता येणार आहेत. सर्व वयोगटातील पर्यटक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक ती सगळी काळजी घेतली जाणार आहे.

पालकमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक
असा प्रकल्प भारतात अन्यत्र कुठेही राबविण्यात आलेला नाही. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी सी वर्ल्ड प्रकल्प आपल्या मतदारसंघातील मालवण तालुक्‍यात प्रस्तावित केला होता. यात जमिनीवर कृत्रिम समुद्रविश्‍व उभारायचे होते. सरकार बदलले आणि भूसंपादनाला विरोध झाल्यामुळे तो प्रकल्प रखडला. आता पालकमंत्री केसरकर यांनी आपल्या मतदारसंघातील निवतीमध्ये हा नवा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. याचे स्वरूप नेमके सी वर्ल्डच्या उलट आहे. येथे नैसर्गिक समुद्रविश्‍वामध्येच पर्यटकांना नेले जाणार आहे. शिवाय भूसंपादन किंवा स्थानिकांचा विरोध होईल असे फारसे घटक यात नाहीत. हा प्रकल्प पैशाची उपलब्धता झाल्यास फार कमी वेळात मार्गी लावता येणारा आहे. सी वर्ल्ड प्रकल्प आता पूर्ण झाला तरी त्याचे जनक म्हणून राणेंचेच नाव घेतले जाणार; मात्र हा नवा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्याचे श्रेय केसरकरांना मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे पर्यटन विकासाबरोबरच इतर अनेक पैलूंचा विचार करता पालकमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल.

या प्रकल्पामुळे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे. हे उच्च दर्जाचे पर्यटन असणार आहे. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून मालवणमध्ये अंडरवॉटर पर्यटन विकासाचे आदर्श मॉडेल उभे करता आले. त्याचे अनुकरण आता अनेक ठिकाणी होत आहे. या नव्या संकल्पनेमुळे वेंगुर्लेतही उच्चदर्जाच्या प्रशिक्षणाचे नवे मॉडेल उभे राहील.
- डॉ. सारंग कुलकर्णी,
सागरी जीव अभ्यासक तथा चिफ इन्स्ट्रक्‍टर अँड जनरल मॅजनेजर, इस्दा

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला खूप मोठी उंची मिळणार आहे. यासाठी सर्वांचेच सहकार्य मिळत असून निधी कमी पडू दिला जाणार नाही. हा प्रकल्प म्हणजे सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा माईल स्टोन असेल. तो यशस्वी झाल्यास पाणबुडीची क्षमता आणखी वाढविता येऊ शकेल. सात-आठ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. याच्या जोडीने भविष्यात सी वर्ल्ड प्रकल्पही पूर्ण केला जाणार आहे. निवती रॉकच्या या प्रकल्पाची जबाबदारी इस्दा या संस्थेवर सोपवली आहे.
- दीपक केसरकर
, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

असा आहे प्रकल्प

 •       हा प्रकल्प समजून घेण्यासाठी आपल्याला ॲक्वेरियमचा विचार करावा लागेल. मोठ्या ॲक्वेरियममध्ये गेल्यावर मासे आणि इतर सागरी जीव काचेच्या पेटीत असतात व आपण बाहेर असतो. या प्रकल्पाच्या बाबतीत आपण पारदर्शक पाणबुडीच्या आत असणार व थेट समुद्राच्या विश्‍वात प्रवेश करणार. यामुळे समुद्राचे वास्तविक रूप, सौंदर्य अनुभवता येणार. या जोडीनेच पाणबुडीमधून प्रवासाचा अनुभवसुद्धा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा असणार आहे.
 •       या प्रकल्पासाठी पालकमंत्री दीपक केसरकर आग्रही होते. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अक्वेटीक स्पोर्टस (इस्दा) या संस्थेने यासाठीचा अभ्यास केला. या प्रकल्पासाठी साधारण ४९ कोटी इतक्‍या अंदाजित खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मदरशिप, बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी (सबमरीन), पॅसेंजर ट्रान्स्फर बोट आणि धक्का अशा चार गोष्टी केल्या जाणार आहेत. साधारण आठ महिन्यांत याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.
 •       या प्रकल्पातील बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीची क्षमता ३० पर्यटक इतकी असणार आहे. याचा आकार पाणबुडीसारखाच असून ती पारदर्शक असणार आहे. आत बसून बाहेरचे विश्‍व न्याहाळता येणार आहे.
 •       स्कूबा डायव्हिंग ही मालवण पर्यटनाची ओळख झाली आहे. तेथील पर्यटन जिल्ह्याच्या सर्व किनारपट्टीपर्यंत पोचविण्यात या प्रकल्पाची मदत होणार आहे. हा प्रकल्प भारतात प्रथमच होणार असल्याने त्याचे विशेष आकर्षण असेल. यामुळे परदेशी पर्यटकही येतील.
 •           यासाठीची पाणबुडी बाहेरून खरेदी करायची असल्याने आणि भूसंपादन व इतर कटकटी नसल्याने हा प्रकल्प नियोजित वेळेत सुरू करणे सोपे आहे. शिवाय पहिला टप्पा यशस्वी झाल्यास याची क्षमता वाढवता येऊ शकेल. सागरी जैवविविधता याच परिसरात उपलब्ध असल्याने अशा प्रकल्पाचे ड्युप्लीकेशन करता येणार नाही.
Web Title: Sindhudurg News Big story on Submarine sea tourism