बीएसएनएल अधिकाऱ्यांना 25 पर्यंत डेडलाईन

प्रशांत हिंदळेकर
शुक्रवार, 20 जुलै 2018

येत्या 25 पर्यंत बीएसएनएलची तालुक्‍यातील सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिला.

मालवण - हिवाळे मतदार संघातील बीएसएनएलचा मनोरा गेले पंधरा दिवस बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येथील दूरसंचार कार्यालयात धडक दिली. यावेळी तुमच्या समस्या सावंतवाडी येथे जाऊन सांगा, असे वक्तव्य मोरया या अधिकाऱ्याने केल्याने स्वाभिमानचे पदाधिकारी आक्रमक झाले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. येत्या 25 पर्यंत बीएसएनएलची तालुक्‍यातील सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिला.

तालुक्‍यातील हिवाळे मतदार संघातील रामगड येथील बीएसएनएलचा मनोरा गेले पंधरा दिवस बंदावस्थेत आहे. त्याशिवाय अनेक दूरध्वनीही बंद आहेत. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, नगरसेवक यतीन खोत यांच्यासह रघुनाथ धुरी, संतोष बाईत, प्रशांत परब, शशिकांत सुकाळे, राजू राणे, प्रसाद मुद्राळे, स्वप्नील परब, दीपक पाटकर, पपू परब, विलास सुकाळे, रामदास पवार, राजू परब, सुधा श्रावणकर, रूपेश परब, श्‍याम परब या ग्रामस्थांनी येथील बीएसएनएलच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. 

यावेळी बीएसएनएलचे संबंधित अधिकारी रामगड येथे गेले असल्याची माहिती देण्यात आली. कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यास बंद असलेल्या मनोऱ्याची दुरूस्ती केव्हा होणार अशी विचारणा केली असता त्यांनी तुमच्या समस्या तुम्ही सावंतवाडी येथे जाऊन मांडा असे सांगितले. यावर संतप्त झालेल्या स्वाभीमानचे अशोक सावंत, मंदार केणी, महेंद्र चव्हाण यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्हाला जर समस्या सोडविता येत नसतील तर कार्यालयात बसू नका असे सुनावले. यावर अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

गेले दोन, तीन महिने बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. सातत्याने कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही ही समस्या सोडविण्यात बीएसएनएल अपयशी ठरले आहे. तालुक्‍यातील बीएसएनएलची सेवा येत्या 25 पर्यंत सुरळीत न झाल्यास कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू न देता टाळे ठोकू असा इशाराही श्री. सावंत, श्री. केणी यांनी यावेळी दिला.

Web Title: Sindhudurg News BSNL network problem