मोटारीच्या धडकेत कॅमेरामॅनचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मालवण -  भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने दुचाकीस दिलेल्या धडकेत खासगी वृत्तवाहिनीचे कॅमेरामन दीपक अशोक वाघमारे (वय 34, रा. कातवड-खैदा) यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर मोटार चालकाने थांबून जखमीला उपचारासाठी हलविण्याचे सौजन्य न दाखवत येथून पळ काढला.

मालवण -  भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने दुचाकीस दिलेल्या धडकेत खासगी वृत्तवाहिनीचे कॅमेरामन दीपक अशोक वाघमारे (वय 34, रा. कातवड-खैदा) यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर मोटार चालकाने थांबून जखमीला उपचारासाठी हलविण्याचे सौजन्य न दाखवत येथून पळ काढला.

ही दुर्घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान मालवण आचरा रस्त्यावर कोळंब खडवन येथे घडली. मोटार चालक भूषण उर्फ अभी मेस्त्री (वय 28, रा. रेवतळे) याला किरकोळ दुखापत झाल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बुधवारी (ता. 20) रात्री साडे दहा वाजता आपले दैनंदिन कामकाज आटोपून दीपक हे दुचाकीने कोळंब पुलावरून कातवड येथील घरी जात होते. याचवेळी अभी हा मोटारीने कणकवलीवरून आचरामार्गे मालवणला येत होता. कोळंब खडवन याठिकाणी दीपक यांच्या दुचाकीला मोटारीची जबरदस्त धडक बसली. यात दीपक यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. गाड्यांचा वेग एवढा प्रचंड होता की धडकेत मोटारीमधील दोन्ही एअर बलून उघडले गेले. या धडकेत दीपक हे गाडीपासून काही अंतरावर फेकले गेले. अपघात घडताच अत्यवस्थ पडलेल्या दीपक यांना उपचारासाठी हलविण्याचेही सौजन्य मोटार चालकाने न दाखवता पोलिस ठाण्यात पळ काढला. 

खडवन येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच कोळंब ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत 108 रुग्णवाहिका आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक यांची तपासणी केली असता ते जागीच मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले. अपघातामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
 

Web Title: sindhudurg news cameraman death in accident