सिंधुदुर्ग होते आहे काजूचे आगर

सिंधुदुर्ग होते आहे काजूचे आगर

सिंधुदुर्गात यंदा काजू रोपांची विक्रमी लागवड झाली. येत्या काही वर्षांत जिल्ह्यात पडीक क्षेत्रासह डोंगररांगा काजूचे आगर होण्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. लागवडीयोग्य जमीन आणि पोषक वातावरण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणातील काजूला मिळत असलेली वाढती मागणी आणि त्यामुळे काजूचे वर्षागणिक वाढत असलेले दर ही त्यामागील कारणे आहेत. पुढील पाच वर्षांत जिल्ह्याच्या अर्थकारणात काजू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अद्यापही शेकडो एकर जमीन गावागावांत पडीक स्थितीत आहे. त्यामध्ये काजूची लागवड झाल्यास त्याचा जिल्ह्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होऊ शकेल; परंतु काजू लागवडीचे क्षेत्र वाढवताना पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात महत्त्वाची मानली जाणारी घनदाट जंगले टिकविणे तेवढेच आवश्‍यक आहे.

परकीय चलन देणारे पीक
काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विशेषतः कोकणातील काजूला असणारी चव उत्तम असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जगाचा विचार केला असता काजू उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी मानला जातो. भारताच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा मोठा आहे. महाराष्ट्रात कोकणचा हिस्सा अधिक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने काजू हे पीक कोकणाला परकीय चलन मिळवून देणारे आहे.

येथे होते काजू उत्पादन
भारतात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये काजूची लागवड आहे. समुद्र किनारपट्टीलगतच्या भागामध्ये काजू उत्तम दर्जाचा होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड व राधानगरी तालुक्‍यांतील काही भागांत काजूची लागवड केली जाते.

सिंधुदुर्गाचे काजू क्षेत्र
जिल्ह्यात यापूर्वी १९९० च्या दरम्यान फलोद्यान कार्यक्रमांतर्गत आंबा, काजूसह अन्य झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत काजूची लागवड अधिक आहे. २०१६ पूर्वी काजू लागवड झालेले क्षेत्र ५९ हजार २७७ हेक्‍टर इतके आहे.

दर मिळाल्यानेत लागवडीत वाढ
गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी काजू लागवड केली, त्या काजूच्या वाढलेल्या दरामुळे त्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून त्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होताना दिसत आहे. याची जागृती अन्य शेतकऱ्यांमध्ये होऊ लागल्याने काजू लागवडीकडील कल वाढू लागला आहे. शासनाच्या एमआरजीएस, ईजीएस, मोफत रोपे अशा विविध योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे काजू लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
जिल्ह्याच्या अर्थकारणात काजू महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, याची खात्री झाल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यंदा फळ लागवडीसाठी दहा हजार हेक्‍टर क्षेत्राचे लक्ष्य कृषी विभागासमोर ठेवले होते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचा ज्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक कारणामुळे लाभ मिळणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोपवाटिकांमध्ये काजू रोपे तयार करून त्यांना मोफत रोपे देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर काजू लागवड केली आहे. एकाच वर्षात झालेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी काजू लागवड आहे.

पडीक जमीन लागवडीखाली
जिल्ह्यात हजारो हेक्‍टर जमीन पडीक आहे. ही जमीन कित्येक वर्षांपासून वापरात नाही. काजूतून मिळू लागलेल्या उत्पन्नामुळे या पडीक जमिनीवर आता काजू लागवड होऊ लागली आहे. डोंगर किंवा उताराच्या जमिनीवर पाण्याचा निचरा चांगला होतो. काजूच्या लागवडीकरिता अशी जमीन उत्तम मानली जाते. या जमिनीवर आता लागवड होऊ लागली आहे.

आंब्याच्या चौपट काजू लागवड
देवगड हापूसला जगभरात मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील देवगडसह काही तालुक्‍यांतील शेतकरी आंब्यावर अवलंबून आहेत. आंब्यामुळे अनेकांची भरभराट झाली आहे; परंतु गेल्या काही वर्षांत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आंबा लागवडीकडील कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात २०१२ ते २०१६ या कालावधीत आंबा लागवडीखालील क्षेत्र हे २१८ हेक्‍टर इतके आहे, तर काजू लागवडीखालील क्षेत्र १ हजार ८७ हेक्‍टर इतके आहे. यावर्षीसुद्धा काजूची विक्रमी लागवड झाली आहे.

या जातींना प्राधान्य
दापोली कृषी विद्यापीठ आणि वेंगुर्ले संशोधन केंद्राने काजू लागवडीसाठी तयार केलेल्या पद्धतीचा कोकणात वापर केला जातो. सध्या कोकणात वेंगुर्ले चार, सात नव्याने विकसित करण्यात आलेली वेंगुर्ले आठ आणि नऊ या काजूच्या रोपांना शेतकऱ्यांमधून मोठी मागणी आहे. काजूची लागवड करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर केला जातो; परंतु सरळ आणि तिरकस पद्धत या प्रमुख पद्धती मानल्या जातात. अलीकडे तिरकस पद्धतीने काजू लागवड करण्याचे प्रमाण अधिक आहे. या पद्धतीत कुठूनही काजूची रोपे पाहिल्यास एका रांगेत दिसतात. काजू रोपांची वाढ झाली तरी दोन्ही काजू रोपांच्या फांद्यांचा एकमेकांना तितकासा त्रास होत नाही. सरासरी ७ मीटर बाय ७ मीटर अंतर ठेवून लागवड केली जाते. हीच पद्धत सध्या प्रचलित आहे.

दरवाढ चढत्या क्रमाने
काजूच्या दरात दरवर्षी वाढ होते. काजूला असणारी मागणी आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत आहे. काजू हे सुक्‍या मेव्यातील महत्त्वपूर्ण फळ मानले जाते. काजू खाणारा वर्गदेखील हायप्रोफाईल समजला जातो. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांनाच तो परवडतो. त्यामुळे काजूचे दर दरवर्षी वाढत असतात. दोन वर्षांपूर्वी ६० रुपये प्रतिकिलो असलेली काजू बी सध्या १५० रुपये इतक्‍या सरासरी दरावर पोचली आहे.

प्रक्रिया उद्योगाची वानवा
देशात सर्वांत अधिक काजू महाराष्ट्रात उत्पादित होतो; परंतु राज्यात प्रक्रिया उद्योगाची वानवा आहे. उत्पादित काजूपैकी फक्त २५ टक्केच काजूवर राज्यात प्रक्रिया होते, तर उर्वरित काजूवर परराज्यात प्रक्रिया होते. त्यामुळे राज्यात प्रक्रिया उद्योग वाढल्यास त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल. याशिवाय स्थानिक तरुणांना स्वयंरोजगार मिळू शकेल.

काजू बोंडावर प्रक्रिया आवश्‍यक
गोव्यात काजू बोंडापासून मद्यार्क तयार केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांकडील काजू बोंडे व्यापारी बागांमध्ये जाऊन खरेदी करतात. गोवा हद्दीलगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांकडून काजू बोंडे गोव्यातील व्यापारी घेऊन जातात; परंतु उर्वरित जिल्ह्यांतील शेकडो टन बोंडूंची नासाडी होते. त्यामुळे काजू बोंडूंवर प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. मद्यार्क हाच त्याकरिता पर्याय नसला तरी काजूपासून बनविण्यात येत असलेल्या चांगल्या दर्जाचे सरबत बनविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जिल्हा विकासाचा टर्निंग पॉईंट
पर्यटन, आंबा, मासळी याशिवाय अन्य व्यवसायाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते; परंतु आंबा पीक घेणारे काही तालुके आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्‍यात आंबा पिकाला पोषक वातावरण नाही. त्यामुळे अशा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना काजू हा सक्षम पर्याय आहे. 

या शेतकऱ्यांनी काजू लागवडीकरिता पावले उचलली तर तो जिल्हा विकासाचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. जिल्ह्याच्या अर्थकारणात सध्या मत्स्योत्पादन, फलोत्पादन आणि काही प्रमाणात पर्यटन हे तीन घटक प्रभाव टाकत आहेत. यातील मत्स्योत्पादनातून आर्थिक उलाढाल अधिक असली तरी मत्स्य दुष्काळामुळे त्यावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटन क्षेत्र वाढीला मर्यादा आल्या असून ठराविक भागातच त्याचा विकास होताना दिसत नाही. या तुलनेत फलोत्पादनामध्ये काजू आणि आंबा ही दोन पिके जिल्ह्याच्या अर्थकारणात प्रमुख भूमिका बजावत आहेत; मात्र बदलत्या हवामानाचा आंब्यावर अधिक प्रभाव पडू लागल्याने या पिकाकडे पाहण्याची दृष्टी उदासीन होऊ लागली आहे. दुसरीकडे काजू क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने येत्या पाच वर्षांत जिल्ह्याचे अर्थकारण चालविण्यात या पिकाची मुख्य भूमिका असेल असे चित्र आहे.

पर्यावरणदृष्ट्या विचार आवश्‍यक
जिल्ह्यात सध्या काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला हे वास्तव असले तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या जंगलांची कत्तल करून लागवड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. जंगले नष्ट झाल्यास तेथे वास्तव करून असलेले अनेक कीटक बागायतीमध्ये येण्याचा धोका असतो. जो काजू बागायतीसह अन्य सर्वच पिकांना धोकादायक ठरू शकतो.

जुन्या काजूवर संशोधन आवश्‍यक
पूर्वी कोकणात जी काजूची झाडे होती ती उंचीने आणि जाडीने मोठी होत असत. त्यांपैकी काही झाडे ही मोठ्या प्रमाणात उत्पादन देत असत; परंतु काही झाडांपासून काहीही उत्पादन मिळत नसे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने संशोधन केलेल्या रोपांची लागवड सुरू केली; परंतु जुन्या काजूमध्ये जी रोपे चांगले पीक देत आहेत, त्या काजूपासून रोपांची निर्मिती करता येऊ शकते का, याबाबत विचार होणे आवश्‍यक आहे. त्या काजूच्या झाडांचे आयुर्मानदेखील अधिक असते.

ठोस धोरणाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील जमीन काजू लागवडीकरिता योग्य व पोषक आहे हे सिद्ध झाले आहे. येथे काजूचे उत्पादन वाढविल्यास येथील शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होऊ शकेल; परंतु शासनाने काजू लागवड आणि काजू उद्योगाबाबतचे धोरण तयार करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना तारणारे धोरण आखल्यास नक्कीच पुढील पाच- सहा वर्षांत येथील शेतकरी सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाल्याशिवाय राहणार नाही.

जिल्ह्यात काजू लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात संशोधन केंद्र असल्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या काजू रोपांची निर्मिती केलेली आहे. भारतात सर्वाधिक जाती येथे संशोधन केलेल्या आहेत. त्यातच अलीकडे काजूला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडील कल वाढला आहे. यावर्षी सुमारे ४ हजार क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली असून त्यातील सुमारे ६० टक्के क्षेत्र हे काजू लागवडीखालील आहे.
- शिवाजी शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग

आम्ही १९९८ पासून काजू लागवडीच्या कामात सक्रिय आहोत. जिल्ह्यात काजू लागवडीला मोठा वाव आहे. येथील जमीन व हवामान काजूला पोषक आहे. याशिवाय गेल्या १९ वर्षांत कधीही काजूचे दर कमी झालेले नाहीत. दरवर्षाला ते वाढताना दिसतात. त्यामुळे काजूचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांनी काजू करताना लागवडीविषयी पूर्ण माहिती करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावी.
- प्रा. विवेक कदम, 
काजू लागवड सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com