रेल्वे एजंटाने बनवले मुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरपॅड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

कणकवली - मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट लेटरपॅड तयार करून रेल्वेच्या प्रवाशांना व्हीआयपी कोटा आरक्षण मिळवून दिल्याप्रकरणी कणकवलीतील रेल्वे दलालाला अटक करण्यात आली. 

कणकवली - मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट लेटरपॅड तयार करून रेल्वेच्या प्रवाशांना व्हीआयपी कोटा आरक्षण मिळवून दिल्याप्रकरणी कणकवलीतील रेल्वे दलालाला अटक करण्यात आली. 

मुंबईतील सीआयडी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून योगेश मनोहर हेरेकर (वय ३२, रा. शिवाजीनगर, कणकवली) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. हा प्रकार उजेडात आल्याने रेल्वेच्या दलालांची एकच तारांबळ उडाली आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयातून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांत याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या काही प्रवाशांना व्हीआयपी कोट्यात तिकीट देण्यात आले होते. 

शहरातील एका नामवंत वकिलालाही मुख्यमंत्र्याच्या लेटपॅडचा आधार घेऊन तिकीट देण्यात आले होते. एका प्रवाशाला मुंबई ते कणकवली असे दिलेले तिकीट हे मुख्यमंत्री कोट्यातून होते. तसेच ओरोस येथील प्रवाशाला व्हीआयपी कोट्यातून तिकीट देण्यात आले होते. ही सर्व तिकिटे योगेश हेरेकर याच्यामार्फत वितरित झाली होती.

कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्य कार्यालयातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे ‘त्या’ लेटरहेडबाबत खात्रीसाठी माहिती मागविण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाने अशा पद्धतीने या कार्यालयाकडून पत्र दिली जात नाहीत, असा खुलासा कोकण रेल्वेच्या पत्राला उत्तर देताना केला. त्यामुळे कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयातून मुंबईच्या डीसीबी, सीआयडी युनिट एक कडे हे प्रकरण चौकशीसाठी देण्यात आले होते. या चौकशीसाठी पोलिस उपनिरीक्षक मोरे, हेडकॉन्स्टेबल चव्हाण आणि पाटील यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली. 

मुख्यमंत्र्याच्या पत्रानुसार ज्या प्रवाशांना तिकीट देण्यात आली होती. अशा काही प्रवाशांची चौकशी मुंबईच्या सीयआडी पथकाने शुक्रवारी (ता. ६) दिवसभर केली. या वेळी त्या पत्राशी प्रवाशांचा काहीही संबंध नसून ती तिकिटे कणकवलीतील योगेश हेरेकर याच्याकडून मिळाल्याची माहिती चौकशी पथकाला मिळाली.

त्यानंतर शिवाजीनगर येथील हेरेकर याच्या घरावर छापा टाकण्यात आला. काल (ता. ५) रात्री साडेदहा वाजता हेरेकर याला ताब्यात घेतले. या वेळी मुख्यमंत्र्याच्या नावाची काही लेटरपॅड पोलिसांच्या हाती सापडली अशी माहिती पोलिस सूत्राकडून मिळाली आहे. याबाबत मुंबई पोलिसांत हेरेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दलालांची टोळी उजेडात येणार...
कोकण रेल्वेला गणेशोत्सव आणि उन्हाळी सुटीच्या हंगामात प्रवाशांना नेहमीच प्रतीक्षा यादीवरील तिकीट मिळते. रेल्वेच्या नियमानुसार ९० दिवसांपूर्वी आगाऊ आरक्षण असलेतरी तिकीट मिळत नाही. यामागे मोठा दलालीचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. आता मात्र या प्रकरणामुळे रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणारी दलालाची मोठी टोळी उजेडात येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sindhudurg news chief ministers fake letter pad