चिपी येथील विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

सिंधुदुर्गनगरी -  चिपी येथील विमानतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

सिंधुदुर्गनगरी -  चिपी येथील विमानतळाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या जूनपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

राज्याने प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडण्याची निर्णय घेतला. त्या अंतर्गत वेंगुर्ले तालुक्‍यातील चिपी येथे विमानतळ प्रस्तावित केले. जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणे व पर्यटनाचा विकास करणे या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. आजमितीला या विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २७४ हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प साकारत आहे. जून २०१८ पर्यंत हे विमानतळ कार्यान्वित करण्याचा प्रशासनाचा उद्देश असून त्यादृष्टीने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे.

या विमानतळाची धावपट्टी ६० मीटर रुंद व ३.५ किलोमीटर लांबीचे असून पहिल्या टप्प्यात २.५ किलोमीटर लांबीची धावपट्टी बांधून झाली आहे. उर्वरित १ किलोमीटर लांबीच्या धावपट्टीचे अस्तरीकरण बाकी असून दळणवळण वाढल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता १५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगची ही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी असणार आहे.

१० हजार चौरस मीटरचे टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे ६ ते १८० प्रवासी क्षमतेची विमाने या ठिकाणी उतरू शकतात. त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरचे कामही पूर्ण झाले आहे. हा टॉवर विमानांना उतरण्यास व उड्डाणास मदत करतो. विमानांना दिशा कळवण्याचे कामही टॉवर करतो. 

हे विमानतळ कुडाळपासून २५ किलोमीटर तर सावंतवाडीपासून ११०, मालवणपासून फक्त १५ तर वेंगुर्लेपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. त्यापैकी या विमानतळास संलग्न असणारा सागरी महामार्ग कुंभारमाठ-परुळे-सातार्डा या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी सुमारे २५ कोटी खर्च अपेक्षित आहे. जवळच्या कुडाळ शहराशी वेगवान वाहतुकीसाठी ३८ कोटी खर्चाच्या कुडाळ-पाट रस्त्याच्या रुंदीकरणाचा व दुरुस्तीचा प्रस्तावही आहे. 

जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोवा राज्याकडे जातात. पण चिपीचे विमानतळ झाल्यानंतर थेट दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात येणे पर्यटकांना सोपे जाणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्याने मोठे नाव कमावले आहे, पण सध्या हा आंबा बागायतदारांना मुंबई येथील व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. तेथून आंबा देशाच्या इतर भागात व परदेशात निर्यात होतो. विमानतळामुळे चिपी परिसरात कार्गो हब निर्माण होईल. त्यामुळे आंबा देशातल्या व विदेशातील बाजारपेठेत थेट पाठवणे सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांना शक्‍य होईल. त्यामुळे आंब्याचा ताजेपणा व विशिष्ट चव राखणेही शक्‍य होणार आहे. एकूणच आंबा बागायतदारांच्या उत्पन्नात यामुळे वाढ होईल. 

मत्स्य खवय्यांची संख्या वाढत आहे. हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ताजी मासळी देशाच्या अंतर्गत भागात पोचवणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चांगला फायदा होणार आहे.

रोजगारवाढीची संधीही उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय विमान वाहतूकीमुळे अनेक खासगी आस्थापना सिंधुदुर्गाकडे वळतील. त्यातून औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळेल.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत होत असलेल्या या प्रकल्पाचे काम आय.आर.बी. कडे सोपवण्यात आले आहे. यासाठी ५२१ कोटींचा निधी मंजूर आहे. एकूणच या विमानतळाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. हे विमानतळ फोस सी प्रकारातील आहे. भविष्यातील लागणाऱ्या सर्व सोयींचा विचार करुन या विमानतळाची उभारणी केली जात आहे.

Web Title: Sindhudurg News Chipi Airport work in final stage