सरपंचपदसाठी काँग्रेसला उमेदवार मिळेनात

सरपंचपदसाठी काँग्रेसला उमेदवार मिळेनात

वैभववाडी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सरपंचपदाकरीता उमेदवार मिळणे मुश्‍‍कील झाले आहे. त्यातच नव्याने जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्‍वीकारलेल्या विकास सावंत यांच्याकडून कोणतेही प्रयत्न देखील होताना दिसत नाहीत. त्यामुळे निवडणूक जिंकणे दूरच सध्या काँग्रेसला सरपंचपदाकरिता उमेदवार मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीची निवडणुक १६ ऑक्‍टोबरला आहे. प्रथमच सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीत रस घेतला आहे. प्रत्येक पक्ष आपापले सरपंच उमेदवार आणि सदस्य पदाकरीता उमेदवारांसह पॅनेल तयार करू लागले आहेत. पक्षीय चिन्हाचा वापर या निवडणुकीत होणार नसला तरी पक्षाचे उमेदवार उभे केले जात आहेत. या निवडणुकीत नारायण राणेंचे समर्थ पॅनेल, भाजप, शिवसेना आणि गावविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. राणेंच्या समर्थ पॅनेलने प्रत्येक गावात पुर्ण क्षमतेने पॅनेल तयार केले आहे; परंतु काँग्रेसचे नामोनिशाण कुठेच दिसून येत नाही.

नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यावर त्यांच्या हजारो समर्थकांनीही काँग्रेसचा त्याग केला. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून लढणार असल्याचे यापुर्वीच घोषीत केले असून त्यांची निवडणूक पॅनेल आणि रणनिती देखील तयार आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना आणि भाजपही निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरली आहे; मात्र १३० वर्षाचा इतिहास असणारी काँग्रेस जिल्ह्यातुन हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, असे वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. परंतु प्रत्यक्षात निवडणूक जिंकणे दुरच काँग्रेसला सरपंचपदाकरीता उमेदवार मिळताना मुश्‍‍कील झाले आहे. 

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर ज्या पद्धतीने काँग्रेसने पक्षात राहू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्याशी संवाद, संपर्क ठेवणे अपेक्षित होते तो ठेवलेला नाही. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असलेले कित्येक कार्यकर्ते आहेत. त्यांना अन्य दुसऱ्या कोणत्याही पक्षाची विचारसरणी पचनी पडत नाही. ते कार्यकर्ते काँग्रेस नेत्यांच्या पाठबळाच्या प्रतिक्षेत आहेत; परंतु त्यांच्यापर्यत अद्याप कुणीही पोहोचलेले नाही. 

जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना या निवडणुकीसाठी वेळ कमी मिळाला असला तरी संपर्कासाठी अस्तित्वात असलेल्या साधनाचा विचार केला तर ते नक्कीच कित्येक लोकांशी संपर्क साधु शकले असते. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांना नक्कीच कोण काँग्रेसमध्ये राहतील याची जाण खात्रीशीर असेल; परंतु त्यांच्याकडुन कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. जर काही अंशी हालचाल केली असती तर निम्म्याहुन अधिक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता उमेदवार निवडणुक रिंगणात उभे करू शकले असते. 

अर्ज भरण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्या हातातून वेळ निघुन गेली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक संधी होती. राणेंनी काँग्रेसमधील एकही पदाधिकारी काँग्रेसमध्ये राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली. जे संशयित होते त्यांच्यावर लक्ष ठेवले होते. कुणीही आपल्या निर्णयानंतर तत्काळ बाजुला होवु नये, म्हणुन अतिशय चोख नियोजन त्यांनी केले. त्यामुळेच नव्यासोबत जुनेदेखील राणेमय झाल्याचे चित्र तूर्तास पाहायला मिळत आहे.

राणेंसोबत काँग्रेसचे अनेक जुने कार्यकर्ते आहेत. त्यांना कोणताही पर्याय नसल्यामुळे ते त्यांच्यासोबत आहेत. राणेंनी अद्यापही पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर केलेला नाही. जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर कित्येक वर्षापासुन काँग्रेस विचारसरणी मानणारे भाजपात जाण्याची सुतराम शक्‍यता नाही.

थेट सरपंच आणि राजकीय पक्ष
थेट सरपंच निवडीमुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीत कधी नव्हे एवढा रस घेतला आहे. पक्षाचा उमेदवार निश्‍चित करून निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत जरी पक्षाचे चिन्ह नसले तरी निवडणूक पक्षीय पातळीवर होत आहे. समर्थ पॅनेल, शिवसेना, भाजप हे पक्ष आटापिटा करताना दिसत असून त्याला काँग्रेस मात्र अपवाद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com