खोल.. खोल.. दरीत लपताहेत गुन्हे

खोल.. खोल.. दरीत लपताहेत गुन्हे

आंबोली - गेल्या काही वर्षांत आंबोलीमधील शेकडो फूट खोल दरी आणि इथला दुर्गम परिसर पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकमधील गैरकृत्य लपविणारे डंपिंग ग्राऊंड बनला आहे. सांगलीतील पोलिसांनी केलेल्या प्रकारामुळे हे वास्तव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले; पण हे कुठेतरी थांबविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाय योजायला हवेत.

हा प्रश्‍न समजून घेण्यासाठी आंबोलीची भौगोलिक स्थिती लक्षात घ्यायला हवी. आंबोलीत एकूण क्षेत्राच्या ७० टक्के वनक्षेत्र आहे. यातील बरेच दुर्गम आणि निर्मनुष्य आहे. धुके, काही भागात असलेली दाट झाडी यामुळे पूर्ण क्षेत्रात कायमस्वरूपी मानवी वास्तव्य नसते. शिवाय आंबोली हे कोकणातील सुरुवातीचे गाव असून याच्या एका बाजूला शेकडो फूट खोल दरी आहे. यात उतरायला मार्ग नाही. त्यामुळे एखाद्याला या दरीत फेकल्यास त्याचा थांगपत्ता लागणे कठीण असते.

या भौगोलिक दुर्गमतेचा गुन्हेगारांनी गैरफायदा घेतल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून उघड होत आहेत. पर्यटन क्षेत्र असल्यामुळे ज्याचा घातपात करायचा, त्याला फिरायला आणण्याचे कारण सांगून आंबोलीत घेऊन येणे फारसे कठीण नसते. बऱ्याचदा इतर ठिकाणी घातपात करून मृतदेह येथील दरीत फेकला जातो. असे बरेच प्रकार गेल्या आठ-दहा वर्षांत उघड झाले; मात्र उघड झालेल्या प्रकारांपेक्षा जास्त घटना येथे घडल्या असाव्यात, असा संशय घ्यायला वाव आहे.

पर्यटनामुळे थेट दरीच्या टोकापर्यंत रस्त्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे अशा गुन्हेगारांचे फावते. दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातील एका व्यावसायिकाचा खून झाल्याचा प्रकार उघड झाला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही महिलांच्या खुनाचे प्रकारही या आधी उघडकीस आले. आंबोली घाटात मे महिन्यात दरडीजवळ तरुणीचा मृतदेह सापडला होता; मात्र तिची ओळखही पटली नाही आणि या प्रकरणाचा छडाही लागला नाही. 

सांगलीच्या घटनेतही आरोपी सापडले नसते तर त्यांनी आंबोलीत येऊन केलेले गैरकृत्त्य कधीच उघडकीस आले नसते. दरीत उतरण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा पोलिसांकडे नाही. बाबल आल्मेडा आणि त्यांची टीम सामाजिक हेतूने दरीत उतरुन अडलेल्यांना मदत करतात. पोलिसांसाठी तोच एक आधार आहे. प्रत्यक्ष पोलिस खाली जाऊन पाहणी करु शकत नसल्याने तपासालाही मर्यादा येतात. पूर्ण आंबोलीवर २४ तास लक्ष ठेवणे फार कठीण आहे. या सगळ्यामुळे अशा गुन्हेगारी प्रकारांना आणखी वाव मिळाला आहे. गेल्या काही महिन्यात दर दोन आठवड्याला असा प्रकार उघड होऊ लागला आहे.

राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात घडणारे हे प्रकार नक्कीच भूषणावह नाहीत. यामुळे आंबोलीसारख्या शांत, सुसंस्कृत पर्यटन स्थळाची काही संबंध नसताना बदनामी होत आहे. गेल्या काही वर्षात येथे उघड झालेल्या घातपाताच्या प्रकारांमध्ये आंबोली गावाचा किंवा येथील रहिवाशांचा दूरचाही संबंध नाही. असे असूनही फुकटची बदनामी का? हा आंबोलीवासियांना पडणारा प्रश्‍न प्रशासन आणि पोलिस खात्यातील वरिष्ठांसह लोकप्रतिनिधींना विचार करायला लावणारा आहे.

करुळ, फोंडाघाट, रामघाटातही गुन्हे...
केवळ आंबोलीतच असे प्रकार घडतात असे नाही. जिल्ह्यातील करुळ, फोंडाघाट या घाटमार्गावरील दऱ्यांमध्ये तसेच तिलारीतील रामघाटातही असे प्रकार याआधी उघड झाले आहेत. अशा घटनांमध्ये मुळात प्रकार उघड व्हायला खूप दिवस जातात. या कालावधीत मृतदेह सडलेला असतो. त्याची ओळख पटविणे कठीण असते. त्यामुळे गुन्हा उघड व्हायला मर्यादा येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com