अपुऱ्या यंत्रणेमुळे खाकीही हतबल

आंबोली ः येथील पोलिस तपासणी नाक्‍यावर वाहनांची तपासणी होते.
आंबोली ः येथील पोलिस तपासणी नाक्‍यावर वाहनांची तपासणी होते.

आंबोली - दरीत किंवा त्याच्या परिसरात होणाऱ्या गैरकृत्त्यांसाठी स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले जाते; मात्र त्याहीपेक्षा तेथे पुरविलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवावे लागते. येथे गेले काही दिवस तपासणी नाक्‍यावर असलेले सीसीटिव्ही बंद आहेत; पण ते तातडीने सुरु करण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही.
येथील दुर्गम परिसरात घातपातासारख्या कारवाया वारंवार घडतात. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मृतदेह आणण्याचे प्रकार घडतात. ते सर्रास रस्त्यावर आणि तपासणी नाका पार करुन येतात. काहीवेळा गोवा बनावटीच्या दारूची या भागातून पश्‍चिम महाराष्ट्राकडे बेकायदा वाहतूक होते. या सगळ्याला सर्रास स्थानिक पोलिसांनी जबाबदार धरले जाते. यात काही अंशी तथ्य असलेतरी पोलिसांची वरिष्ठ यंत्रणाही या सगळ्यास तितकीच जबाबदार आहे.

वर्षा पर्यटनावेळी अतिउत्साही पर्यटकांकडून धिंगाण्याचे प्रकार अनेक दिवस सुरु आहेत. वाहतूक कोंडीची समस्याही या काळात जाणवते. अशावेळी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही, पोलिसांच्या संख्याबळ वाढविणे, गाड्यांची कसून तपासणी, संपर्क यंत्रणा अधिक सुसज्ज  करणे गरजेचे आहे; मात्र गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात असूनही आंबोलीत तितकीशी सक्षम यंत्रणा नाही.

येथील तपासणी नाक्‍यावर आठ पोलिसांची आवश्‍यकता असताना तेथे चारच पोलिस दिले जातात. घाटात होणारे अपघात,कर्मचारी सुटी, रात्रीपाळी समन्स बजावणे अशा कामांचा विचार करता गाड्यांची तपासणी करायला एखाद दुसरा कर्मचारी उरतो. तो आजुबाजूला गेल्यास तपासणीच्या ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागतात. या पुढचा कहर म्हणजे तेथे बसवलेले सीसीटिव्ही चार महिने बंद आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सीसीटिव्हीची मेमरी २८ दिवसांपर्यंतचे फुटेज रेकॉर्ड करते. त्यानंतर हे फुटेज डिलीट केले जाते. वास्तविक त्याची जपणूक करण्याची गरज आहे.

कॅमेरे बंद असतांना तपासासाठी हा मार्गही बंद राहतो.
येथील तपासणी नाक्‍याच्या आजुबाजूने जाणारे इतरही मार्ग आहेत. त्यामुळे तीही अडचण येते. मे मध्ये दरडीच्या जवळ एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. स्थानिकांनी त्या काळातील सीसीटिव्ही तपासण्याची मागणी केली होती. एखादी गाडी ठराविक काळानंतर परत आली असल्यास तिची चौकशी करुन यातून तपासला गती देता आली असती; पण त्यावर फारसे काम झाले नाही. ही स्थिती सुधारण्यासाठी सक्षम आणि पुरेशी पोलिस यंत्रणा असणे आवश्‍यक आहे. 

पालकमंत्री दीपक केसरकर आंबोली आपले दुसरे घर असल्याचे सांगतात. त्यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद आहे. त्यांनी या प्रश्‍नाकडे अधिक गांभिर्याने पाहून आंबोलीतील पोलिस यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याबरोबरच पुरेसे पोलिस बळ देण्याची  गरज आहे.

इगो दुखावतो...
बेळगाव आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या मार्गावर तपासणी नाका गरजेचा आहे. सहायक उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी येथे कायमस्वरुपी देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा बड्या व्यक्तीची गाडी तपासल्यास त्यांचा इगो दुखावला जातो. त्यातून पोलिसांना त्यांच्या रोषास सामोरे जावे लागते. अधिकारी तैनात असल्यास हा प्रश्‍न फारसा जाणवणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com